कनेडी प्रशालेत बुधवार 10 जून रोजी विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर

‘Explore • Discover • Achieve’ उपक्रमातून तज्ज्ञांकडून करिअरच्या नव्या वाटांची माहिती
कणकवली : मयूर ठाकूर
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि योग्य करिअर निवडीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा “करिअर गाईडन्स प्रोग्राम – Explore • Discover • Achieve” हा मोफत मार्गदर्शन कार्यक्रम बुधवार, १० जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता माध्यमिक विद्या मंदिर, कनेडी येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय विज्ञान संवादक केंद्र (NCSC), मुंबई यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा लाभ इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध असल्या तरी योग्य दिशा आणि मार्गदर्शनाची गरज भासते. हीच गरज लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि आधुनिक उद्योगविश्वातील विविध क्षेत्रांची माहिती मिळणार आहे.
कार्यक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, कृषीशास्त्र, गणित व सांख्यिकी, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जैवतंत्रज्ञान, अवकाश विज्ञान, कृषी व्यवसाय तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांतील करिअरच्या संधींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी अनुभवी तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून करिअर निवड, उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, संशोधन क्षेत्रातील संधी, रोजगाराच्या बदलत्या दिशा आणि भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या शंकांचे निरसन करण्याची तसेच वैयक्तिक मार्गदर्शन मिळविण्याचीही संधी उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमात डॉ. चंद्रशेखर मराठे (भौतिकशास्त्र), डॉ. संजय भगवत (जीवशास्त्र व कृषीशास्त्र), परेश चिटणीस (संगणक व आयटी सुरक्षा) आणि सुहास नाईक-साटम (खगोलशास्त्र) हे मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सतीश सावंत व चेअरमन आर. एच. सावंत यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
📞 सुमंत दळवी (मुख्याध्यापक/प्राचार्य) – ९४२०२०६५०८
📞 बयाजी बुराण (पर्यवेक्षक) – ९४२११४४६०५
📞 संदीप राणे – ९४२०३०६३०६





