स्वसंवादातून स्वतःला समजून घ्या !
मानसोपचार तज्ज्ञ डॉ रुपेश धुरी यांनी साधला विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी सुसंवाद
बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयात व्याख्यानमाला
प्रतिनिधी । कुडाळ : आजच्या धावपळीच्या जगातून हरवत चाललेली: पण मानसिक संतुलन राखण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘स्व-संवाद’! स्व-संवादातून स्वतःला समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि सोपे सुद्धा आहे .स्वतःशी बोलणे, स्वतःच्या गरजा ओळखून घेणे ,कार्यक्षमता समजून घेणे आणि स्वतःच्या मर्यादांवर लक्ष केंद्रित करणे ह्या सर्व गोष्टी जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण करतात. आणि सकारात्मक दृष्टिकोनच आयुष्य निरोगी बनवितो .असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश धुरी यांनी काढले. ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्नित बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग कुडाळच्या वतीने बाही:शाल शिक्षण मंडळाच्या विद्यमाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थिताना “संवाद कौशल्य” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “दैनंदिन सामाजिक जीवनात जसा इतरांशी सुसंवाद महत्त्वाचा असतो तसा तो स्वतः शीही संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे .स्वतःला समजून घेताना , स्वतःच्या उणीवा समजून घेताना व आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य ती दिशा यातूनच आपल्याला मिळते .आणि सकारात्मक ऊर्जा यातूनच प्राप्त होते .आपण कुठे चुकतो ,कुठे कमी पडतो ,आपल्याला आपल्यात काय गुणदोष आहेत हे प्रत्येकाने एकदा तरी एकांतात न्याहाळावेत, म्हणजे आयुष्यात जगण्याचा मार्ग सुकर होतो. कारण प्रत्येक व्यक्ती ही स्वतःची पहिली गुरु असते .स्व-संवादासाठी आत्मकेंद्रित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे .आपल्याला जर प्रभावीपणे इतरांना समजून घ्यायचे असेल तर ते तंत्र आधी स्वतःमध्ये विकसित व्हायला हवे. असे उद्गार डॉक्टर रुपेश धुरी यांनी काढले.
यावेळी व्यासपीठावर बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळच्या उपप्राचार्य सौ .कल्पना भंडारी ,प्रा. शांभवी आजगावकर, प्रा.प्रणाली मयेकर व गौतमी माईणकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा.गौतमी माईंणकर यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.