कुडाळात वर्षा कुडाळकर यांच्यासह चार जणांचे पाच अर्ज अवैध

पंचायत समिती साठीचे सगळे ६४ अर्ज वैध
कुडाळ : तालुक्यातील जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली. यावेळी जि. प. च्या प्राप्त 48 पैकी 43 उमेदवारी अर्ज वैध तर चार जणांचे 5 उमेदवारी अर्ज अवैध ठरले. पं. स. च्या प्राप्त 64 पैकी सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले. जि. प. व पं. स. मिळून प्राप्त 112 पैकी 107 अर्ज वैध ठरले आहेत.
जि. प. च्या अवैध अर्जात वर्षा कुडाळकर (अपक्ष) यांचे तेंडोली व पिंगुळी दोन्ही अर्ज अवैध ठरले आहेत. पिंगुळी जि. प. मतदारसंघातील अंकुश रामा जाधव (वंचित बहुजन आघाडी) व कल्पेश काशिनाथ मसके (अपक्ष) आणि पावशी जि. प. मतदारसंघातील रामदास गोपाळ ठाकूर (अपक्ष) यांचे अर्ज अवैध ठरल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकरी ऐश्वर्या काळूसे यांनी दिली. छाननी प्रक्रिये दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन पाटील, संजय गवस आदी उपस्थित होते. यावेळी सर्व उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते.
वर्षा कुडाळकर यांनी शिंदे शिवसेनेला सोडचिठ्ठी देत पिंगुळी व तेंडोली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांचे दोन्ही अर्ज बाद ठरल्याने आता त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बाकीच्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी हि आहे.





