11 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अक्षरोत्सव प्रदर्शन

रिंगणे येथे 31 जानेवारी व 1 फेब्रुवारीला आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव या आगळ्यावेगळ्या संग्रहाचे प्रदर्शन रिंगणे येथे होणाऱ्या 11 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात आयोजित केले आहे. हे प्रदर्शन 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी असे दोन दिवस वाचकांना पहायला मिळणार आहे. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई दरवर्षी हे साहित्य संमेलन आयोजित करते.

या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक विश्वास चव्हाण यांच्या हस्ते 31 जानेवारीला सकाळी 10 वाजता करण्यात येईल. तर या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर असून संमेलन उद्घाटक लालबाग राजा सचिव सुधीर साळवी असून यावेळी आमदार किरण सामंत, लांजा नगराध्यक्ष सावली कुरूप, कोकण मिडियाचे संपादक प्रमोद कोनकर, लेखिका डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी, शाहू फुले आंबेडकर विचारवंत नामदेव खामकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी अनेक ठिकाणी प्रदर्शने –
यापूर्वी बेळगाव, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, चिपळूण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळा, वाचनालये आणि इतर कार्यक्रमानिमित्त मिळून 25 प्रदर्शने झाली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध मान्यवरांनी या संग्रहाचे कौतुक केले असून विविध ठिकाणी नामवंत व्यक्तींनी प्रदर्शनाला भेटही दिलेली आहे. याशिवाय या अनोख्या संग्रहाबद्दल निकेत पावसकर यांची सह्याद्री वाहिनीसह सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्र यावर मुलाखतही प्रसारित झाली आहे.

निकेत पावसकर हे पत्रकार असून कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या 20 वर्षात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह करत आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे 2 हजार मान्यवर व्यक्तींची संदेश पत्रे भारतीय पोस्ट कार्डवर घेतलेली आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.

दोन दिवस चालणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून विशेषत: शालेय मुलांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन निकेत पावसकर यांनी केले आहे.

या परदेशी व्यक्तींची पत्रे संग्रहात (चौकट)
निकेतच्या या संग्रहामध्ये जागतिक किर्तिचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मुहम्मद युनुस (बांग्लादेश), आयर्लंड देशाचे पंतप्रधान-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेन्ट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कँरोल अल्ट, मॉडेल-अभिनेत्री-गायिका-नृत्यांगना आणि प्राणीमित्र ब्रिगेट बार्दोत (पॅरीस), वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रिमीयर मार्क मँकगोवन, सुप्रसिध्द टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी (अमेरिका) या परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे.

error: Content is protected !!