खारेपाटण महाविद्यालय येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य शंकराव पेंढारकर यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला राज्यभरातील युवा वक्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचे उद्घाटन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीणशेठ लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी प्रमुख पाहुणे मा. श्री. श्रीकृष्ण पाटणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संस्था संचालक डॉ. आत्माराम कांबळे, संस्थेचे सचिव श्री. महेशजी कोळसूळकर, सहसचिव श्री. राजेंद्र वरूणकर, खजिनदार श्री. संदेशजी धुमाळे, तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक उपस्थित होते. नवीन चंद्र मोफतलाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय सानप व पर्यवेक्षक श्री. राऊत यांचीही उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुणे श्री. श्रीकृष्ण पाटणकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात परिस्थितीशी जुळवून घेणारा, विचारशील व जबाबदार युवा वक्ता घडणे ही काळाची गरज असून तो राष्ट्रविकासासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन केले.
या स्पर्धेत एकूण २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा प्रथम क्रमांक एस. एस. पी. एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवली येथील कु. तनया गणेश पांचाळ हिने पटकावला. द्वितीय क्रमांक वंझारे कॉलेज, लांजा येथील कु. सानिया उदय यादव हिने तर तृतीय क्रमांक कु. अथर्व विवेक पाध्ये याने मिळवला. उत्तेजनार्थ खारेपाटण महाविद्यालयाच्या कु. माधवी सुरज शेंगाळे व कु. हर्षाली श्रीधर कानडे यांना गौरवण्यात आले.
स्पर्धेसाठी भारतीय न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता, मीडिया : सत्याचा आवाज की सनसनाटीचा बाजार, विकास व पर्यावरण – आरे ते तपोवन, भारतीय लोकशाही एकाधिकारशाहीच्या दिशेने का, तसेच भारतीय शिक्षणव्यवस्था आणि बेरोजगारी या विषयांवर सखोल विचारमंथन झाले. परीक्षक म्हणून प्रा. वैभव खानोलकर व प्रा. तानाजी गोधडे यांनी काम पाहिले.
विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तानाजी गोधडे व प्रा. माधवी पांचाळ यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. गजानन व्हंकळी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.





