“समान मत समान किंमत” हळवल फाट्यावरील बॅनर बनला आहे जिल्ह्यात चर्चेचा विषय

15 हजाराच्या रकमेवरून ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय नको!
कणकवलीतील मतदारांना पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून तालुक्यातील ग्रामीण मतदारांकडून अपेक्षा वाढली
कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत लक्ष्मी दर्शनाचा मुद्दा भरपूरच चर्चेत आला होता. या निवडणुकीत कणकवलीतील काही प्रभागांमध्ये 10, 15, 25, 30 हजारापर्यंत ची रक्कम वाटप झाल्याचे बोलले जात होते. अशाप्रकारे पैसे वाटपाला जरी पुरावा नसला तरी कणकवलीत ही चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू होती. आता या रकमेचा धागा पकडून मतदारांनी अप्रत्यक्षपणे या बॅनरच्या माध्यमातून आपली भेट मागणी राजकीय पक्षांकडे मांडली आहे. या बॅनर मध्ये म्हटले आहे, शहरातील मतदारांना 15000 देणाऱ्यांनी ग्रामीण मतदारांवर अन्याय करू नये. हा बॅनर हळवल फाट्यावर कणकवली मध्ये लावला आहे. लोकशाहीची थट्टा मांडणारा पैसे वाटपाचा हा प्रकार नेमका या बॅनरच्या माध्यमातून सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरणार आहे. कारण पैसे वाटप हा मुद्दा प्रत्येक राजकीय पक्षाकडून होत असताना मात्र आता शहरी मतदारांना जर 15000 मिळतात तर तीच रक्कम आम्हाला पण द्या. अशी अप्रत्यक्ष मागणी या बॅनर द्वारे करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे हा बॅनर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय बनला आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





