देवगड येथील युवतीच्या छेडछाडप्रकरणी सहा जणांना पोलीस कोठडी

प्रतिनिधी देवगड
देवगड येथे एका युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती गिते (शेलाळी, नांदेड) याच्यासह सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयितांमध्ये चारजण पोलीस सेवेत आहेत. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास घडली होती. पोलिसांनी संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता सर्व संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील पोलीस शिपाई हरिराम गीते आणि प्रवीण रानडे हे दोघेही वसई येथे वाहतूक शाखा पोलिस म्हणून कार्यरत आहेत. तर एक जण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि एक जण राज्य राखीव पोलीस दल येथे कार्यरत आहे.
देवगड येथे पर्यटनासाठी आलेले संशयित हरिनाम गिते, माधव सुगराव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम बालाजी गिते (सर्व शेलाळी, नांदेड), शंकर संभाजी गिते (बदलापूर (पू), ठाणे), प्रवीण विलास रानडे (वसई (पू)) हे मंगळवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास देवगड बाजारपेठेच्या दिशेने जात होते. याचमार्गे पीडित युवती ही आपल्या घरी परतत होती. या रस्त्यावरील वळणाच्या ठिकाणी संशयित आरोपींनी युवतीला पाहून कार थांबवली. कारमधील संशयित हरिनाम गिते याने पीडित युवतीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून छेडछाड, विनयभंग केला. त्याचवेळी इनोव्हा कारमधून संशयित माधव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम गिते, शंकर गिते, प्रवीण रानडे या संशयितांनी पीडित युवतीकडे पाहून टिंगलटवाळी केली. तसेच पीडित युवतीला गाडीमधून घेऊन जाण्याच्या इराद्याने व बेकायदेशीर कोंडून ठेवण्याची व गंभीर इजा पोहोविण्याच्या उद्देशाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. याबाबतची फिर्याद पीडित युवतीने देवगड पोलीस स्थानकात दिली.