मालवण कथामालेचे संस्कार परीक्षा आयोजन
आचरा–अर्जुन बापर्डेकर
हे वर्ष पूज्य साने गुरुजींचे शतकोत्तरी महोत्सवी वर्ष म्हणून साने गुरुजी कथामाला मालवण यांनी साजरे करावयाचे ठरविले आहे. “प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी. कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे” असा संदेश देणाऱ्या संस्कारभूषण पूज्य साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी पालगड दापोली येथे झाला. त्यांच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला ‘श्यामची आई संस्कार परीक्षा’ हा उपक्रम घेण्याचे मालवण कथामालेने ठरविले आहे. नुकत्याच खालील शाळांशाळांत श्यामची आईच्या संक्षिप्त प्रती परीक्षार्थी मुलांना देण्यात आल्या. यात गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगाव, आर.पी. बागवे हायस्कूल मसुरे, ओझर विद्यामंदिर कांदळगाव, ज्ञानदीप विद्यामंदिर वायंगणी, न्यू इंग्लिश स्कूल आचरे, जनता विद्यामंदिर त्रिंबक, प्रगत विद्यामंदिर रामगड, भगवती हायस्कूल मुणगे, आर. बी. राणे हायस्कूल नारिंग्रे देवगड, या माध्यमिक शाळातील तर केंद्रशाळा मसुरे नं.१, मसुरे देऊळवाडा, जि. प. शाळा वेरली, मालवण दांडी, कोळंब नं.१, सर्जेकोट, कातवड, देवली खालची, तोंडवली वरची, आचरे नं.१, आडवली नं.१, पळसंब नं.१, आधी शाळेतील पाचवी ते सातवीच्या जवळजवळ ६०० मुलांनी सदर परीक्षेत सहभाग नोंदविला आहे.
विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या हाती पुस्तक जाईल. चार महिन्यानंतर या पुस्तकांवर ‘श्यामची आई संस्कार परीक्षा’ साने गुरुजी कथामाला घेणार असून यशवंत विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत.
या उपक्रमातबाबत बोलताना सुरेश ठाकूर (अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण) म्हणाले, “कथामाला मालवण गेली वीस वर्षे ६ ते १४ वयोगटातील विविध उपक्रम घेत असते. कथाकथन स्पर्धा, संस्कार शिबिरे, कथाकथन तंत्र-मंत्र, आकाश दर्शन, निसर्ग सहल आधी उपक्रम नियमित राबवले जातात. यावर्षी निवडक विभागातील सहाशे मुलांची साने गुरुजी संस्कार परीक्षा घेण्याचे नियोजन मालवण कथामालेने केले आहे. ‘श्यामची आई’ ही गुरुजींची कादंबरी गेली चार पिढ्या मुलांच्या हृदयात घर करून आहे. त्या पुस्तकांने दिलेले संस्कार कुटुंबा-कुटुंबात रुजविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे,” असे ठाकूर म्हणाले.