उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या कुडाळमध्ये प्रचारसभा

आमदार निलेश राणे यांनी केली सभास्थळाची पाहाणी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या, मंगळवारी दुपारी ३:०० वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आज सायंकाळी आमदार निलेश राणे यांनी सभेच्या ठिकाणची पाहणी केली.
कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी या सभेचे नियोजन अत्यंत काटेकोर केले आहे. सभेसाठी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर भव्य व्यासपीठ आणि कार्यकर्त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. निलेश राणे यांनी आज स्वतः सभेच्या ठिकाणी उपस्थित राहून व्यवस्थेची आणि सुरक्षा तयारीची पाहणी केली. ही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या सभेला कुडाळ, मालवणसह संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत असून, अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. अशातच एकनाथ शिंदे यांची ही सभा महायुतीच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या नियोजनाच्या पाहणी वेळी रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, काका कुडाळकर,संपर्क प्रमुख नगरसेवक ठाणे राजेश मोरे, अभिषेक गावडे, साईनाथ महाडदळकर,चेतन पडते, आबा धडाम, देवेंद्र नाईक, रोहित भोगटे, राजवीर पाटील,ऍड राजीव कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.





