महायुतीमुळे जि. प. च्या अनेक योजना रखडल्या – वैभव नाईक

शिवसेना ठाकरे सेनेचा वचननामा प्रसिद्ध

माजी आमदार वैभव नाईक यांची पत्रकार परिषद

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदार संघातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण ४४ जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्यासाठी ठाकरे सेनेचा वचननामा आज माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्ध केला. त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सत्ताधारी आमदार आणि पालकमंत्री यांच्यावर जोरदार टीका केली. जिल्हा परिषदेमध्ये जोरदार भ्रष्टाचार आहे. जलजीवन मिशनची अपूर्ण कामे, बंद होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, ३८ पैकी केवळ चार आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर, बंद केलेली सिंधुरत्न योजना, मनरेगा अंतर्गत महायुती सरकारने थकीत ठेवलेली मजुरी, विकासकामात वाढलेली टक्केवारी, बचतगटांचे अनेक प्रस्ताव प्रलंबित, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात सरकार अपयशी, रखडलेली जिल्हा बँकेची नोकर भरती याकडे माजी आमदार वैभव नाईक यांनी लक्ष वेधलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षाचा वचननामा माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्ध केला. यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, बबन बोभाटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारावर आणि विद्यमान आमदार, पालकमंत्री यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाचा महत्वाचा दुवा म्हणजे जिल्हा परिषद.आरोग्य, शिक्षण, कृषी, ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधांसंबंधित शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे हि जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असते. परंतु, १९९७ पासून २०२२ पर्यंत त्याच त्याच लोकांकडे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सत्ता असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाश्वत विकास सोडाच परंतु जिल्ह्याच्या मुलभूत गरजा देखील ते पूर्ण करू शकले नाहीत. २५ वर्षाच्या सत्ता काळात जिल्हा परिषदेच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून सत्ताधाऱ्यांनी बंगले, गाड्या, बँक बॅलन्सची अमाप माया जमविली आहे. मागील २५ वर्षात जे पदाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सत्तेत होते, त्याच चेहऱ्यांना आता पुन्हा एकदा संधी देण्यात आली असून दुर्दैवाने ते पुन्हा निवडून आल्यास पुढील ५ वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निधीत भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली जाईल. सत्ताधाऱ्यांनी लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी ५ ते १५ हजार रुपयांपर्यंत पैसे वाटप केल्याचे आपण पहिले आहे. तर आताच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी थेट विरोधी उमेदवारांना २५ ते ४० लाख रुपयांचे अमिष देऊन, त्यांच्यावर दबाव टाकून निवडणूक बिनविरोध करण्याचा घाट घातला. या माध्यमातून नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेऊन हुकुमशाहीकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे. हे पैसे शासनाच्या निधीत भ्रष्टाचार करूनच मिळवले होते, अशी टीका वैभव नाईक यांनी केली.
सतीश सावंत यांच्या भाजप प्रवेशाबाबत वैभव नाईक म्हणाले, सतीश सावंत हे जेर विकास कामांसाठी भाजपमध्ये गेले असतील तर त्यांची विकासाची व्याख्या काय आहे हे त्यांना विचारावे लागेल. कोणता विकास बघून त्यांनी प्रवेश केला, हे त्यांना मी नक्की विचारेन असे श्री. नाईक म्हणाले. निवडणुका आल्या कि मतदारांचे लक्ष विचलित करायचे आणि दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासायचे काम पालकमंत्री आणि स्थानिक आमदार करत आहेत अशी टीका देखील वैभव नाईक यांनी केली.
जिल्हा परिषदेमध्ये आपल्या काळात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही या आमदार निलेश राणे यांच्या विधानावर बोलताना वैभव नाईक यांनी विविध उदाहरणे देऊन जिल्हा परिषद मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याचे सांगितले. टेंडरसाठी याच जिल्हा परिषदेमध्ये बाउन्सर बोलवले होते याची आठवण त्यांनी करून दिली.
जिल्ह्यात कणकवली मतदार संघात ९५ टक्के बिनविरोध उमेदवार निवडून आले. पण कुडाळ मालवण मधील आमचे उमदेवार धनशक्तीला भाळले नाहीत. त्यामुले या मतदार संघात आमचे उमेदवार ठाम राहिले असल्याचे माजी आमदार वैभव नाईक नाईक शेवटी म्हणाले.

error: Content is protected !!