मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळीत भीषण अपघात

कारच्या धडकेत महिला जागीच ठार
अवैध पार्किंगमुळे अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे
मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी धुरी टेंबनगर येथे आज सकाळी ९:४५ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ६२ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. आशा सोनू धुरी असे मृत महिलेचे नाव असून, रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारने त्यांना धडक दिल्याने हा अपघात घडला. दरम्यान महामार्गावर अवैधरित्या उभ्या करून ठेवलेल्या वाहनांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरीकांनी केला आहे. पोलिसांनी त्या वाहनांवर कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशा धुरी या सकाळी महामार्ग ओलांडत होत्या. त्याचवेळी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एम.एच. ५८-०१८९ क्रमांकाच्या मारुती सुझुकी XL6 कारने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर आशा धुरी यांचे अवयव शरीरापासून वेगळे झाले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात उभी असलेली ट्रक्स आणि इतर मोठी वाहने या अपघाताला कारणीभूत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या उभ्या वाहनांमुळे रस्ता ओलांडणाऱ्यांना किंवा वाहन चालवणाऱ्यांना समोरून येणारे वाहन दिसत नाही, परिणामी येथे वारंवार अपघात होत आहेत अशी माहिती स्थानिक नागरिक यांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, स्थानिकांच्या तक्रारीची दखल घेत वाहतूक पोलिसांनी महामार्गावर अवैधपणे पार्क केलेल्या गाड्यांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
या घटनेमुळे धुरी टेम्बनगर आणि पिंगुळी परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील पार्किंगचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे.





