तुम्ही पोरके झाले नाहीत,तुम्ही आमचे आहात-पालकमंत्री नितेश राणे.

कणकवलीतील श्रद्धांजली कार्यक्रमात अबिद नाईक भावनिक,पालकमंत्री नितेश राणेंनी दिला आधार.
कणकवली/प्रतिनिधी
अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आज कणकवली येथे भावनिक वातावरणात पार पडला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अजितदादांवर प्रेम करणारा जनसमुदाय या कार्यक्रमासाठी कणकवलीत दाखल झाला होता.या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अजितदादा पवार यांचा हस्ती कलश सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यात आला.कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिर येथे अबीद नाईक यांच्या उपस्थितीत हस्ती विसर्जन करण्यात आले.या वेळी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात अजितदादांबद्दलची आपुलकी स्पष्टपणे दिसून येत होती.
श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान जिल्हाध्यक्ष अबिद नाईक हे आपल्या भावना व्यक्त करताना भावनिक झाले.त्यांनी “आज आम्ही पोरके झाल्यासारखं वाटतं”अशी भावना व्यक्त करत अजितदादांशी असलेलं नातं शब्दांत मांडलं.त्यावेळी उपस्थितांमध्येही भावनिक शांतता पसरली होती.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढे येत उपस्थितांना आणि अबिद नाईक यांना भावनिक आधार दिला.“तुम्हाला आम्ही पोरके होऊ देणार नाही.कोकणच्या विकासामध्ये अजितदादा पवार यांचा मोठा वाटा आहे.पक्ष वेगळे असू शकतात,झेंडे वेगळे असू शकतात,पण आपण सगळे एका कुटुंबाचे घटक आहोत.तुम्ही आमचेच आहात,त्यामुळे कधीही स्वतःला पोरके समजू नका,अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना आधार दिला.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,शिवसेना उपनेते संजय आग्रे,जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर,जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांट्स,कणकवली माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर,राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजू पावसकर,वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर,कुडाळ तालुका अध्यक्ष आर.के सावंत,देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान,विलास गावकर,संदीप राणे,चिटणीस एम.के गावडे,महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब,जिल्हा सचिव सुशील चमणकर,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असलम खतीब,उद्योग व्यापार सेल जिल्हाध्यक्ष आशिष कदम,कणकवली शिक्षण प्रसारक मंडळ सिक्रेटरी बाळासाहेब वळंजु,प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे,शहर अध्यक्ष इम्रान शेख,जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक,राजेश पाताडे,सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबळेकर, हरिभाऊ भिसे,बाळू मेस्त्री, उदय सावंत,शहर चिटणीस सचिन अडुलकर,शहर उपाध्यक्ष गणेश चौगले, दीपेश सावंत,भाजप शहर अध्यक्ष अण्णा कोदे,सौ. सुप्रिया पाटील,सौ.उज्वला जावडेकर,अनिल हळदीवे आदी उपस्थित होते





