कणकवलीतील ज्येष्ठ भांडी व्यापारी सुधाकर पोरे यांचे निधन

कणकवली बाजारपेठेतील भांडी व्यवसायाचे ज्येष्ठ व प्रतिष्ठित व्यापारी सुधाकर परशुराम पोरे (वय ८५) यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने कणकवली शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.
कणकवली बाजारपेठेत पोरे ब्रदर्स या नावाने त्यांनी अनेक दशके भांड्याचा व्यवसाय यशस्वीपणे चालवला. त्यांच्या प्रामाणिक व्यवहारामुळे व व्यवसायिक निष्ठेमुळे कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.
‘आप्पा’ या प्रेमळ नावाने ओळखले जाणारे सुधाकर पोरे हे शांत, संयमी व मितभाषी स्वभावासाठी बाजारपेठेत सर्वपरिचित होते.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, एक मुलगा, सून, दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. महापुरुष मंदिर समोरील भांडी व्यवसायिक राजू पोरे यांचे ते वडील, तर आनंद पोरे यांचे काका होत. त्यांच्यावर सोमवारी सकाळी कणकवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.





