मुख्याध्यापकाकडून शाळेतील मुलींचा विनयभंगवैभववाडी तालुक्यात खळबळ

पोक्सोंतर्गत गुन्हा, चार दिवसांची पोलिस कोठडी

तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने दहा ते पंधरा मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्या मुख्याध्यापकावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यापूर्वी स्थानिकांनी या मुख्याध्यापकाला चार दिवसांपूर्वी चोप दिल्याची चर्चा आहे.
जिल्ह्याबाहेरील संस्थेच्या तालुक्यातील एका गावात माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयातील दहा ते पंधरा अल्पवयीन विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांविरोधात शनिवारी रात्री उशिरा विनयभंगाची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, या मुख्याध्यापकाने २१ जुलै २०२५ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत तायक्वांदो प्रशिक्षण देण्याच्या बहाण्यासह विविध कारणांनी विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केले.
सुरुवातीला बदनामीच्या भीतीपोटी विद्यार्थिनी गप्प राहिल्या; परंतु त्याचे हे कृत्य वाढत चालल्याने काही विद्यार्थिनींनी पुढाकार घेत चार दिवसांपूर्वी काही स्थानिकांकडे यासंदर्भात कैफियत मांडली. त्यानंतर स्थानिकांनी या मुख्याध्यापकाला विद्यालयात जाऊन यथेच्छ प्रसाद दिल्याची तालुक्यात चर्चा झाली.
दरम्यान, शनिवारी रात्री विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिस स्थानक गाठत त्या मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दिली. पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्या मुख्याध्यापकांविरोधात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला रविवारी (दि.१)अटक करण्यात करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

error: Content is protected !!