महाराष्ट्र ओपन कॅरम स्पर्धेत के श्रीनिवासन विजयी

अपंग कॅरमपटू जगन्नाथ मैत्राणीला १ लाखाची मदत

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित श्री हालारी विसा ओसवाल समाज हॉल येथे संपन्न झालेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत तिसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफीच्या विजयाची माळ तेलंगणाच्या के श्रीनिवासच्या गळ्यात पडली. अंतिम फेरीत या विश्व् विजेत्या कॅरमपटूने महाराष्ट्राच्या अभिषेक चव्हाणवर अटीतटीच्या लढतीत ९-२०, २३-०, २५-४ असा विजय मिळवला. दरम्यान केवळ एका हाताच्या करंगरळीवर कॅरमवर वर्चस्व गाजवणारा दिव्यांग कॅरमपटू जगन्नाथ मैत्राणीच्या चिकाटीला सलाम म्हणून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने त्याचा या समारंभात १ लाख रुपयाचा धनादेश देऊन विशेष सन्मान केला.
उप उपांत्य सामन्यात अभिषेकने आंतर राष्ट्रीय खेळाडू उत्तर प्रदेशच्या महम्मद आरिफवर १३-१०, १५-१७ व २४-० असा अनपेक्षित विजय मिळवल्यामुळे अंतिम फेरीत तो काय करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या सामन्यात महाराष्ट्राच्या अभिषेकने सुरुवात अतिशय छान केली होती. परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. दुसरा सेट व तिसऱ्या सेटमध्ये त्याचे सर्व डावपेच निष्प्रभ ठरले. पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणाऱ्या के श्रीनिवासन आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर अंतिम विजय मिळवून चॅलेंजर्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले व १ लाख ५० हजारांचे ईनाम पटकावले. तर अभिषेकने १ लाखाची कमाई केली व द्वितीय क्रमांकाचा चषक पटकावला.
बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, महाराष्ट्र बँक, युनियन बँक, मड जीन्स व बार्बेक्यू नेशन सहपुरस्कृत केलेल्या या स्पर्धेच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत उत्तर प्रदेशचा महमंद आरिफ वरचढ ठरला. त्याने महाराष्ट्राच्या चांद युसूफ शेखला १७-८, १६-१२ असे रोखले आणि ७५ हजारांचे बक्षीस व चषक मिळवला. तर चौथ्या क्रमांकावर समाधान मानलेल्या चांदला ५० हजारांचे बक्षीस मिळाले. उपउपांत्य फेरीत पराभूत झालेल्याना प्रत्येकी २५ हजारांनी गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील एकंदर ३२ खेळाडूंना मिळून ८ लाखांची रोख पारितोषिके देण्यात आली.
अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी की श्रीनिवासन चांद युसूफ शेखचा १८-१०, २५-६ असा फडशा पडला होता. भाग घेतलेल्या पूर्व कॅरमपटूंनी साहित्य पार्टनर असलेल्या सिस्का कंपनीच्या शुअर स्लॅम कॅरम व बुलेट शॉट सोंगट्यांवर एकंदर २३ व्हाईट स्लॅम व १८ ब्लॅक स्लॅमची नोंद केली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून स्पर्धेच्या २ दिवसात अंतिम फेरी सहित एकंदर ३१ सामने सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. शिवाय मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून महत्वाच्या सामन्यांचे धावते समालोचन करण्यात आले.
स्पर्धेतील पहिल्या विजेत्यांना भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष गोपाळ शेलार, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे दादर पश्चिम शाखेचे प्रमुख वासुदेव मुखर्जी, सिस्का कॅरम कंपनीचे प्रमुख अतुल मेहरा, यु एस कॅरम फेडरेशनचे अध्यक्ष अतुल भावे, मड जीन्सचे अजगर शेख, आंध्र महासभा जिमखान्याचे सचिव वेंकटेश, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार यांच्या हस्ते पहिल्या चार खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. तर इतर विजेत्यांना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे खजिनदार अजित सावंत, उपाध्यक्ष, धनंजय साठे, यतीन ठाकूर, प्रदीप भाटकर व सहसचिव केतन चिखले यांनी बक्षिसे दिली. समारंभाचे सूत्रसंचालन प्रसन्ना संत यांनी केले. कॅनडा, श्रीलंका व मालदीवच्या खेळाडूंचा कॅरमचे घड्याळ देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राचा अपंग कॅरमपटू जग्गनाथ मेत्राणी गेली ४० वर्षे सातत्याने सर्व स्पर्धांमध्ये भाग घेत असून त्याच्या या चिकाटीला सलाम म्हणून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने त्याचा या समारंभात १ लाख रुपयाचा धनादेश देऊन विशेष सन्मान केला. जगन्नाथ मैत्राणीला एक हात नसून दुसऱ्या हाताला फक्त एक करंगळी आहे. या एका करंगळीच्या जोरावर तो गेली अनेक वर्षे कॅरमचा आनंद लुटत असून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

error: Content is protected !!