वकील किशोर सिदु वरक याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

१५ दिवसात आत्मसमर्पण करण्याचे न्यायालयाचे आदेश

कुडाळ पोलिसांची माहिती

खंडणी प्रकरणातील संशयित फरारी आरोपी वकील किशोर सिदू वरक याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने आरोपीत यास 15 दिवसात आत्मसमर्पण करण्याबाबत आदेशीत केलेले आहे. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुडाळ पोलिसांनी म्हटले आहे, सिद्धीविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर याचे खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश अशोक शिरसाट यास व त्याचे साथीदार यांना अटक करण्यात आलेली होती. त्या गुन्हयात सिद्धेश शिरसाठ यास मोक्का लावुन त्याचा जामीन होवु देणार नाही याकरीता वकील किशोर सिदु वरक (रा. खानोली, ता. वेंगुर्ला) याने सिद्धेश शिरसाट याची पत्नी सौ. सिद्धी सिद्धेश शिरसाठ यांचेकडे त्याचा साथीदार सुरेश दुर्गा झोरे, (रा. गिरगांव, ता. कुडाळ) याचे मार्फत दहा लाख रुपये खंडणीची मागणी करुन एक लाख रुपये सिद्धेश शिरसाट याचे मित्र योगेश ऊर्फ बंटी तुळसकर व हार्दीक शिगले यांचेकडून कुडाळ एमआयडीसी परीसरात दि. 03.07.2025 रोजी घेतले. त्याबाबत सौ. सिद्धी शिरसाट यांनी दिले तक्रारीवरुन वकील किशोर सिदु वरक व सुरेश दुर्गा झोरे यांचेवर कुडाळ पोलीस ठाण्यात दि. 14.11.2025 रोजी गुन्हा दाखल आहे. नमुद गुन्हयात कुडाळ पोलीसांनी आरोपी सुरेश दुर्गा झोरे यास अटक करुन मा. न्यायालयात हजर करण्यात आलेले होते.
गुन्हयातील मुख्य सुत्रधार संशयित आरोपी वकील किशोर सिदु वरक हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरारी होता. मुदतीत त्याने जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेकरीता अर्ज केलेला होता. तो अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावलेला होता. त्यानंतर त्याने जिल्हा व सत्र न्यायालयाचे निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालय, कोल्हापूर यांचे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केलेला होता. उच्च न्यायालयाने संशयित आरोपी किशोर वरक हाच मुख्य सुत्रधार असल्याचे मत नोंदवुन आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
त्यानंतर फरारी संशयित आरोपी वकील किशोर सिदु वरक याने उच्च न्यायालयाचे आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेकरीता अर्ज सादर केलेला होता. त्या अर्जाची आज दि. 02.02.2026 रोजी सर्वोच्च न्यायालय, दिल्ली या ठिकाणी सुनावणी होवुन सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामीन अर्जाबाबतचा आदेश कायम ठेवुन संशयित आरोपी किशोर वरक याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला तसेच आरोपीत यास 15 दिवसात आत्मसमर्पण करण्याबाबत आदेशीत केलेले आहे. सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजु सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीरंग वर्मा व आदीत्य पांडे यांनी मांडली.
हि कार्यवाही ही पोलीस अधीक्षक डॉ. श्री. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस अंमलदार, कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर यांनी केलेली आहे.

error: Content is protected !!