सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ नवीन वाणांना नाविन्यतेसाठी राष्ट्रीय स्तरावर मानांकन

अच्यूत तेंडोलकर, रघुनाथ नाईक, डॉ. उत्तम फोंडेकर या शेतकऱ्यांचा समावेश
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वनस्पती जाती व शेतकरी अधिकार प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील विविध शेतकऱ्यांकडे असलेल्या जायफळ आणि कोकम या पिकातील तसेच इतर पिकातील नाविन्यपूर्ण जातीची नोंदणी करण्यासाठी “डस चाचणी केंद्र” उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे कुडाळ येथे कार्यान्वित आहे. या प्रकल्पांतर्गत यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ नवीन वाणांना नाविन्यतेसाठी राष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळाले आहे.
यामध्ये तेंडोली, कुडाळ येथील अच्युत तेंडोलकर यांच्या बागेतील जायफळाच्या दोन विशिष्ट वाणांना “तेंडोली समर्थ १ आणि तेंडोली समर्थ २’ असे राष्ट्रीय स्तरावर नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. आरोस, दांडेली येथील प्रगतशील शेतकरी रघुनाथ नाईक यांच्या बागेतील नाविन्यपूर्ण जायफळाच्या वाणाला “गीतारोझ” या नावाने मानांकन मिळाले असून त्याचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. मालवण कुंभारमाठ येथील शेतकरी डॉ. उत्तम फोंडेकर यांच्या लालसर असणाऱ्या शेवग्याला “सिंधुदुर्ग कुंभारमाठ उत्तम” अशा नावाने नोंदणी झाली आहे.
या केंद्रामार्फत रायगड जिल्ह्यातील दिवेआगर भागातील तीन शेतकऱ्यांना कोकम या पिकातील त्यांच्याकडे असलेल्या तीन वाणांना “अमेय कोकम, शांभवी कोकम आणि वैष्णवी कोकम” या नावांनी राष्ट्रीय स्तरावर नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. रत्नागिरी जिल्यातील इतर दोन आणि रायगड जिल्ह्यातील इतर तीन जायफळाच्या झाडाना नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सर्व वाण शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरणार असून जायफळ आणि कोकम या पिकाखालील क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. कारण हे वाण वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे त्यांची कलमे मोठ्या प्रमाणात करून त्यांची लागवड होणे आवश्यक आहे. या सर्व शेतकऱ्यांना नोंदणी व इतर सहकार्य, मार्गदर्शन उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. महेश शेडगे, सह प्रकल्प प्रमुख डॉ. जया वाघ, वरिष्ठ संशोधन छात्र श्री. हर्षद नाईक आणि यंग प्रोफेशनल कु. सुषमा पालव यांनी केली आहे.
या प्रकल्पाचे काम उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे सुरू असून या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन, प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्याकडे असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्य वाण तपासले जातात. त्यांची निरीक्षणे घेऊन तसा अहवाल वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार प्राधिकरण, नवी दिल्ली येथे पाठवला जातो. त्यानंतर त्यांचा सखोल अभ्यास करूनच मग नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते.
संबंधित शेतकरी किंवा शेतकरी समूह त्यासाठी अर्ज करू शकतात. या अर्जात त्यांच्याकडील वाणांची सखोल माहिती दिलेली असते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या वाणांची नोंदणी वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे झाल्यावर अभ्यासाअंती नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते.
शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित – डॉ. विजय दळवी
शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या जुन्या व नाविन्यपूर्ण वाणांची माहिती देऊन त्याची नोंदणी केल्यास त्या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पन्न वाढेल. तसेच शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा देखील होऊ शकतो व तो आपल्या शेतकऱ्यांनी करून घेणे गरजेचे आहे. याबाबत अधिक माहिती व प्रक्रिया उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील डस चाचणी केंद्रामार्फत मोफत दिली जाते आणि प्रक्रिया पूर्ण करण्यास सहकार्य केले जाते, असे डॉ. विजय दळवी यांनी सांगितले.





