हत्तींसोबत जगण्याची कला शिका


हळबे महाविद्यालयातील कार्यशाळेत वक्त्यांचा सूर

प्रतिनिधी l दोडामार्ग
हत्तींना माणसांसोबत जगण्याची सवय झाली आहे, आता माणसांनीही त्यांना स्वीकारून त्यांच्यासोबत जगण्याची कला शिकायला हवी,असा सूर येथील हळबे महाविद्यालयात हत्ती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यशाळेत वक्त्यांनी व्यक्त केला.
तालुक्यात २००२ मध्ये पहिला हत्तींचा कळप दिसला. त्यांना घालवण्यासाठी हत्ती हटाओ मोहिमा राबवल्या गेल्या.हती येण्याच्या मार्गात खंदक खोदले. मिरचीयुक्त दोरखंड बांधले,सौर कुंपण उभारले, मधुमक्षिका पालनाचे प्रयोग केले, हाकारे नेमले,पण हत्ती गेले नाहीत. आता तर मादी हत्तीने इथेच पिलांना जन्म दिला आहे.मागील २१-२२ वर्षात अनेक व्यक्तींचा आणि हत्तींचा मृत्यू झाला.अनेक जखमी झाले. हत्तींच्या भीतीने शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले. त्यामुळे आता हत्ती सोबत जगण्याची कला अवगत केली पाहिजे असे मत जवळपास सर्वांनीच मांडले.
महाविद्यालयातील भूगोल व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक हत्ती दिनानिमित्त ‘ हत्तींचे संरक्षण व संवर्धन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी गोव्यातील पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर,वनश्री फाउंडेशनचे संजय सावंत,सावंतवाडी वन विभागाच्या फिरत्या पथकातील पोलिस गौरेश राणे,प्रगत शेतकरी प्रथमेश गवस,पर्यावरण अभ्यासक वैभव सरदेसाई उपस्थित होते. यावेळी हत्तींमुळे निर्माण झालेले प्रश्न,हत्ती व मानव संघर्ष,तिलारी खोऱ्यातील हत्तीचा अधिवास व भ्रमण मार्ग,लोकसहभागातून हत्ती संरक्षण व संवर्धन या विषयावर चर्चा करण्यात आली.
प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनीही मार्गदर्शन केले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.पी.डी गाथाडे यांनी केले. प्रा.डॉ.संजय खडककर यांनी आभार मानले.
यावेळी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

error: Content is protected !!