संत निरंकारी मिशनकडून पूरग्रस्तांना मदत
आर्थिक दुर्बल परिवारांना वॉटर प्युरीफायर प्रदान
✅प्रतिनिधी l दोडामार्ग
अतिवृष्टीमुळे ७ जुलै रोजी पीठढवळ नदीची पातळी वाढली व जवळच असलेल्या ख्रिश्चनवाडी मधील घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले. या पुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले. काही मातीची घरे जमीनदोस्त झाली, पाण्याच्या प्रवाहात आलेल्या घरांतील सामान वाहून गेले . शेतकरी तसेच इतर नागरिकांनी साठवलेल धान्य भिजून खराब झाले . अनेक लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती, तसेच सेवा भावी संस्थानी जमेल तशी मदत जमा करून या सर्व नागरिकांना आधार दिला.
काही दिवसांनी असे लक्षात आले की पिण्याच्या पाण्याचे स्रोत पूर्ण शुद्ध नाही झाले यामुळे येथील नागरिक पिण्याचे शुद्ध पाणी विकत घेऊन वापरत आहेत. हे लक्षात घेऊन संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आर्थिक दुर्बल असणाऱ्या परिवारांना स्वयंचलित वॉटर प्युरीफायर देऊन मदत करण्यात आली. त्याबद्दल फादर मॅलविन फेराव यांनी आभार मानले .
संत निरंकारी मिशन हे आध्यात्मिक व सामाजिक विचारधारा जतन करणारे मिशन आहे. या अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून आपत्ती मदत व पुनर्वसन कार्ये कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी, चिपळूण, महाड, उत्तराखंड व केरळ आदी ठिकाणी झाले आहे.
ओरोस येथील मदतकार्यवेळी निरंकारी मंडळाचे ओरोस विभाग संयोजक हनुमंत सावंत, मुखी, ज्ञानप्रचारक, सेवादल अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मालवणकर, स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवक व निरंकारी भक्तगण उपस्थित होते.