आडेली तरुण मृत्यू प्रकरण | पत्नीसह तिघे ताब्यात, खुनाचा गुन्हा दाखल
सासरच्या लोकांनी जावयाला चक्क घरी बोलावून शॉक लावून जीवे ठार मारल्याची धक्कादायक आणि माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार आडेली सातेरीगाळू येथे घडला आहे. मात्र या जीवघेण्या प्रकारामागे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे (वय ३२, रा. तळेवाडी) असे त्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्याचा मृतदेह सासरवाड येथील एका नर्सरीत आढळून आला.
दरम्यान मृत भगे याचा भाऊ संगम भगे यानी दिलेल्या तक्रारीनुसार भगे याची पत्नी व सासरे शंकर गावडे व सासू पार्वती गावडे या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती वेंगुर्ला पोलीस ठाण्यातून देण्यात आली. या प्रकारानंतर माणगाव येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर त्या तिघा संशयितांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
याबाबत संगम भगे याने वेंगुर्ला पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे याला त्याची पत्नी नुतन शंकर गावडे, तिचे वडील शंकर सखाराम गावडे व तिची आई पार्वती शंकर गावडे यांनी त्याला जिवे ठार मारण्याच्या उददेशाने काल मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आडेली सातेरीगाळू येथे त्यांच्या मालकीच्या जागेत रहात्या घराजवळ बोलावून घेतले. यावेळी त्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या कंम्पाऊंड भोवती विद्युत ताराचे जाळे तयार करुन, त्या विद्युत तारांच्या जाळ्याचा त्याला शॉक देवून जिवे ठार मारुन खून केला, असा आरोप केला आहे. त्यानुसार वेंगुर्ला पोलिसांनी वसंत भगे याची पत्नी नूतन, सासरे शंकर सखाराम गावडे आणि सासू पार्वती शंकर गावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान संगम भगे याने तक्रारीत म्हटले आहे की, आडेली सातेरी गाळू येथे रहाणारी नुतन शंकर गावडे, हिच्याशी वसंत याचे २४ डिसेंबर २०२३ ला लग्न झाले होते. परंतु लग्नानंतर सुमारे ४ ते ५ दिवसानंतर तिने भाऊ वसंत याच्याशी तु इथे रहायचे नाही, तु माझ्या सोबत माहेरी रहायचे असे सांगून भांडण केले व ती आपल्या माहेरी त्यानंतर भाऊ वसंत याने तिला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु ती सासरी यायला तयार होत नसल्याने, भाऊ वसंत याने तिच्या हट्टापायी तिच्या सोबत आडेली सातेरी गाळू येथे रहाण्याचा निर्णय घेवून, तो तिच्या सोबत राहू लागला. त्यानंतर काही दिवसांनी भाऊ वसंत हा कामावर बाहेर असताना, नुतन हिने वडिलांसोबत सासरी घरी येवून लग्नात दिलेले दागिने वगैरे घेवून ती परत आपल्या माहेरी निघून गेली. याबाबत वसंत याने तिच्या माहेरी जाऊन विचारणा केली असता नुतन व तिच्या आई वडीलांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर सदरचे प्रकरण वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे आले. परंतु भाऊ वसंत याला नुतन हिच्या सोबत नांदायचे असल्याने, त्याने त्याबाबत महिला अत्याचार निवारण कक्ष ओरोस येथे अर्ज केलेला होता. परंतु तेथे देखील नुतन हिने पोलीसांसोबत हुज्जत घालून पोलीसांना मारहाण केल्याने, तिच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
त्यानंतर देखील भाऊ वसंत याला त्याची पल्ली नुतन सोबत नांदावयाचे असल्याने, त्याने वेळोवेळी मध्यस्ती घालून, नूतन हिला आपल्या सोबत रहा असे सांगण्याचे प्रयत्न केले. परंतु नुतन त्याच्या सोबत रहाण्यास तयार झाली नाही. परंतु वसंत याला नूतन ही अधून मधून फोन करुन त्याच्या सोबत बोलत होती. तसेच नुतन हिने तिच्या मालकीच्या जमीनीत विद्युत वाहिन्या सोडल्याचे वसंत ला सांगितले होते. काल मध्यरात्री १२.३० वाजता वहिनीने भेटायला बोलावले असे सांगून सोबत २ मित्रांना घेऊन तो आडेली सातेरी गाळु येथे गेला. मित्रांना लांब उभे राहायला सांगून तो आड वाटेने नुतन हिच्या घराकडे गेला. त्याला जावून बराच कालावधी होवून देखील तो सकाळी ४ वाजेपर्यंत परत न आल्याने, त्या मित्रांनी मला फोन लावला त्यामुळे मी सकाळी ६.३० वा. च्या दरम्याने काहींना सोबत घेऊन आडेली सातेरी गाळू येथे गेलो व याची वेंगुर्ला पोलिसांना खबर दिली. याबाबत वसंत याच्या बायको, सासू, सासरे यांना विचारणा करता. त्यांनी आपणास तो कोठे आहे हे माहित नाही असे सांगितले. त्यामुळे आम्ही त्यांच्या कंम्पाऊंडमध्ये शोध घेतला असता. माझा भाऊ वसंत हा त्यांच्या कंम्पाऊंड मध्ये मयत स्थितीत मिळून आला, तसेच त्याला विद्युत शॉक दिल्याचे आम्हाला दिसून आले. असे वसंत याचा भाऊ संगम याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावेळी घटनास्थळी आडेली सरपंच यशश्री कोंडुस्कर, उपसरपंच परेश हळणकर, सामाजिक कार्यकर्ते विष्णू कॉडस्कर, सदस्य सुधीर धुरी, प्रमोद गवळी, माजी सदस्य संतोष पेडणेकर, साईप्रसाद नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक घनश्याम आडाव, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक ज्ञानदेव गवारे, हेड कॉन्स्टेबल योगेश सारफदार, सुरेश पाटील, भगवान चव्हाण, कॉन्स्टेबल अमर कांडर, राहुल बर्गे, काशी पाटकर, चालक रमेश तावडे यांनी दाखल होत अधिक तपास केला. या घटनेनंतर ओरोस येथील रासायनिक विश्लेषक टीमला पाचारण करण्यात आले. या टीम मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मागाडे, हवालदार संतोष सावंत, पोलीस नाईक कमलेश सोनवणे यांनी मृतदेहाचा अधिक तपास करत घटनास्थळी मिळालेले विविध पुरावे वेंगुर्ला पोलिसांकडे सुपूर्द केले. तसेच घटनास्थळी वेंगुर्ला वीज वितरण चे उपकार्यकारी अभियंता ए. व्ही. कौरवार, ज्युनियर इंजिनिअर अक्षय पावसकर, इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर श्री. कुंभार यांनी दाखल होत विद्युत वाहिन्याबाबत तपास केला. या घटनेची माहिती मिळताच माणगाव येथील माजी सरपंच सचिन धुरी यांच्यासाहित शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होत. वसंत याच्या बायको, सासू व सासरे यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. तसेच हे गावडे कुटुंब कोणाचे ऐकत नाही, गावातही यांचे कोणाशी पटत नाही असा आरोप केला व त्यांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने माणगाव माजी सरपंच सचिन धुरी यांनी केली.