कुडाळ न.प. च्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी
प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेत नागरीकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबरोबरच आरोग्य, पाणी, स्वच्छता, महीला व बालकल्याण तसेच नागरीकांसाठींची तरतुद केलेला २०२३-२४ आर्थिक वर्षाचा शिल्लकी रक्कमेचे अंदाजपत्रक नगराध्यक्षा यांनी सभागृहात सादर केले सदर अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
कुडाळ नगरपंचायतीची विशेष सभा मंगळवार दिनांक २८ फेब्रुवारी, २०२३ रोजी नगराध्यक्ष सौ. आफरीन अब्बास करोल यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाठ तसेच सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका तसेच मुख्याधिकारी सुरज मधुकर कांबळे, प्रशासकीय अधिकारी गितांजली लक्ष्मण नाईक व सर्व विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते. अर्थसंकल्पाचे वाचन लेखापाल स्वप्निल तानाजी पाटील यांनी केले.
या अंदाजपत्रकाची प्रारंभिक शिल्लक २२ कोटी ४१ लक्ष ४ हजार ८६१ रुपये एवढी दाखविण्यात आली आहे. तर एकूण महसुली जमा ६ कोटी ७० लक्ष ८० हजार ७०० दाखविण्यात आली आहे. तर एकूण महसूली खर्च ६ कोटी ६६ लक्ष ४७ हजार ३०६ आहे भांडवली जमा १७ कोटी ४० लक्ष ५७ हजार ३१० व भांडवली खर्च १६ कोटी ४९ लक्ष ६ हजार ९३६ दाखविण्यात आला आहे. दोन्ही मिळून २३ कोटी ३६ लक्ष ८८ हजार ६२९ शिलकी रक्कमेचा अर्थसंकल्प सर्वांनुमते संमत करण्यात आला.
या अर्थसंकल्पात हायमास्ट खरेदीसाठी, पाणी योजनासाठी, सक्शन मशीन साठी, रस्ता दुरुस्तीसाठी नवीन वाहन खरेदीसाठी, बायोगॅस प्लॅन्टसाठी नवीन उद्यानसाठी शहर विकासासाठी तरतुद करण्यात आली आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.