जो न सोचे कवी…. वो कर दिखाए रवी…
हे शीर्षक वाचल्यानंतर वाचकांचा गोंधळ उडणे साहजिक आहे. “जो न देखे रवी, वो देखे कवी” अशी उक्ती असताना हे काय भलतेच, असा कुणाचाही समज होऊ शकतो. पण या लेखाला दिलेले शीर्षक हे पूर्ण विचार करून आणि तारतम्यानेच दिलेले आहे. कारण ज्या व्यक्तीबद्दल लिहायचे आहे, ती व्यक्ती देखील त्या योग्यतेची आहे. कवीही ज्याचा विचार करू शकत नाही, ते करून दाखवतो तो रवी… आणि हा रवी म्हणजे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र जी चव्हाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. १९९५-१९९९ आणि नंतर २००४ ते २०१४ हा सुवर्णकाळ सिंधुदुर्ग जिल्ह्याने पाहिला. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी काही घोडदौड सुरु आहे, त्याचे श्रेय काही निवडक व्यक्तींनाच द्यावे लागेल. कोकणात रेल्वे आणण्यासाठी जीवाचे रान करणारे मधू दंडवते, कोकणला वेगळी दिशा देणारे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हिरीरीने मांडणारे सुरेशजी प्रभू,. कोकणला उद्योजकता शिकवत विकासाचा मार्ग दाखवणारे नारायणराव राणे यापलीकडे यादी फारशी पुढे सरकत नाही. काँग्रेस आणि आघाडी सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे बदली खेळाडूसारखे असायचे. म्हणजे जबाबदारी कुणाचीच नाही. “भावईला नव्हता नवरा आणि वेताळाला नव्हती बायको” अशी स्थिती. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या अनेकांना “राणे वगळता जिल्ह्याच्या चार पालकमंत्र्यांची नावे सांगा” या प्रश्नाचे ठाम उत्तर देता येणार नाही. राणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्रीपद हे इतके घट्ट समीकरण आहे. राणे साहेबांचा तो वारसा त्याच दिमाखात पुढे नेण्याचे काम कोणी करीत असेल तर ते म्हणजे सध्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब!
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ते मंत्री होते. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर त्यांचे बारीक लक्ष होते. संख्येने कमी असणाऱ्या जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम खऱ्या अर्थाने कुणी केले असेल तर ते रविंद्र चव्हाण यांनी. दुर्दैवाने २०१९ साली उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला आणि रवींद्र चव्हाण यांची दुसरी संधी हुकली. पण प्रयत्न करणाऱ्यांनाच नशीब साथ देते असे म्हणतात. रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीत ते खरे ठरले. देवेंद्रजींनी महाराष्ट्रात जो चमत्कार करून दाखवला, त्याचे सारथ्य रवींद्र चव्हाण यांनीच केले. आणि त्यांना सार्वजनिक बांधकाम आणि सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्रीपद देण्यात आले.
राणे साहेब यांनी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण कोकणासाठी खूप मोठे काम उभे केले आहे. रवींद्र चव्हाण हे त्याच पाऊलवाटेवरून चालले आहेत, असे म्हणायला हरकत नाही. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे कोकणाला वाकुल्या दाखवीत आहे. या रस्त्यावर लाखो वाहने नादुरुस्त झाली, हजारो अपघात झाले, शेकडो ठार झाले, जखमी आणि जायबंदी किती झाले याची गणतीच नाही. पण सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा सांभाळताच रस्त्यावर उतरून त्यांनी या कामाला पहिल्यांदा हात घातला. लोकांशी चर्चा केली, प्रसंगी कमीपणा घेतला, वाईटपणा घेतला, प्रसंगी मिन्नतवाऱ्या केल्या, पण शब्द दिल्याप्रमाणे गणेशोत्सवाला एक मार्गिका खुली करून दाखवली.
सध्या मालवण येथे होऊ घातलेल्या नौदल दिनाची चर्चा आहे. संपूर्ण जगभरात पाहिला जाणारा हा सोहळा असणार आहे. याच कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनात पालकमंत्र्यांनी दमदार एन्ट्री केली. २० चेंडूत जिंकायला ५०-६० धावा हव्या असताना विराट कोहलीचा जो फॉर्म असतो, तो त्यांच्या एकूणच वावरात होता. मुंबई येथे मंत्रालयात प्रशासन, नौदल अधिकारी यांची संयुक्त बैठक लावून सगळी योजना तसेच नौदल दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी समजून घेतली. आपण छत्रपतींचा पुतळा उभा करायचा या एकाच ध्यासाने एक शिवप्रेमी मावळा म्हणून त्यांनी ठाशीव काम केले.
जिल्ह्यातील ३८ गडकिल्ले लोकेटेड करण्याचा प्रयत्न, ३८ किल्ल्यांची पूर्ण माहिती गोळा करण्यास प्रशासनास भाग पाडणे, राजकोट किल्ल्याची पुर्नस्थापना करण्याचा निश्चय असे एक ना अनेक. रवींद्र चव्हाण साहेबांची कल्पकता किती अफाट आहे याची ही चुणूक. फक्त ७२ दिवसात छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा व तटबंदी बांधण्याचा विक्रम पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम खात्याने करून दाखवला. मनात आणले तर काहीही होऊ शकते, आणि ते करवून घेण्यासाठी ठाम निर्णयशक्ती असावी लागते, हे पालकमंत्र्यांनी दाखवून दिले.
मालवण ही कोकणच्या पर्यटनाची राजधानी मानली जाते. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मनातील संकल्पना या राजधानीच्या शिरपेचात मानाचे अनेक तुरे खोवणाऱ्या आहेत. पर्यटनाला आवश्यक असणारा विकास या माध्यमातून दिसून येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमिपूजन ज्या ठिकाणी केले तो मोरयाचा धोंडा परिसराचे सुशोभीकरण व कलादालन, ढोपर कोपर पॉईंट सुशोभीकरण, मालवण नगरपालिकेचे ऐतिहासिक कलादालन, राजकोट येथे लाईट अँड साऊंड शो, श्री मौनीनाथ महाराज मंदिर येथे सुशोभीकरण आदींसाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.
जिल्ह्यांच्च्या समस्या मार्गी लावणे आणि सरकार दरबारी त्यांना न्याय मिळवून देणे हे खरेतर पालकमंत्र्यांचे काम असते. पण आपल्या पक्षाला ताकद देणे आणि संघटन उभारणे ही पालकमंत्र्यावरची मोठी जबाबदारी असते. या बाबतीत आजही नारायण राणे साहेब हेच डोळ्यासमोर येतात. चव्हाण साहेब त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन काम करीत आहेत. दोडामार्गपासून खारेपाटण पर्यंत त्यांनी सर्व स्तरातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवला आहे. कार्यकर्त्याच्या हाकेला धावून जाणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाला बळ देणे चव्हाण साहेबांकडून शिकावे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नेतृत्वाला मऊ असून चालत नाही. नेता ठाम आणि प्रशासनावर वचक असणारा हवा असतो. चव्हाण साहेब या बाबतीत देखील अव्वल कामगिरी करीत आहेत.
नारायण राणे साहेब यांचे काम आपण सर्वांनी पाहिले आहे. अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचे किस्से आपण ऐकले आहेत. थेट आणि रोखठोक असे त्यांचे काम असते. हे दोघेही कधी काम घेऊन येणाऱ्याला ताटकळत ठेवत नाहीत. काम होणार असेल तर “हो” म्हणतात आणि होणार नसेल तर स्पष्ट शब्दात “नाही” म्हणून सांगतात. या दोघांसोबत प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव कधी आला नाही. चव्हाण साहेबांबद्दल मात्र तो येत आहे.
नौदल दिनाचा कार्यक्रम हा खरेतर नौदलाचा… केंद्र सरकारचा! पण या कार्यक्रमावर आज पालकमंत्री रवींद्र जी चव्हाण यांचीच छाप जिल्ह्यात येणाऱ्या कोणालाही सहज जाणवेल! प्रामाणिक आणि कर्त्यव्यनिष्ठ कामाची मुद्रा ही उमटतेच आणि आपल्या कामातून नौदल दिनाच्या कार्यक्रमावर रविंद्र जी चव्हाण साहेबांनी कधीही न पुसली जाणारी झळझळीत शिवमुद्रा उमटवली आहे!
मनापासून कौतुक तर आहेच… पण शिवरायांच्या कार्याच्या पूर्तीसाठी आपण जी मेहनत घेतलीत.… पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब…. आपणाला कोकणवासियांचा त्रिवार मानाचा मुजरा!!
अविनाश पराडकर, प्रवक्ते
भाजपा महाराष्ट्र प्रदेश