पालकमंत्री भजन चषकाचे मानकरी वरेरी भजन मंडळ

देवगड तालुकास्तरीय भजन स्पर्धा ; 16 संघांचा सहभाग

भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने आणि श्री देव कुणकेश्वर क्षेत्र ट्रस्टच्या सहकार्याने कुणकेश्वर येथे आयोजित केलेल्या पालकमंत्री भजन चषक स्पर्धेचे विजेतेपद देवगड तालुक्यातील ठिकाणदार देव प्रासादिक भजन मंडळ वरेरी -राणेवाडी यांनी पटकावले आहे. द्वितीय क्रमांक कुणकेश्वर येेथील पावणादेवी प्रासादिक भजन मंडळाने मिळवला आहे.
देवगड तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये देवगड तालुक्यातील 16 भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. रविवारी 26 ऑक्टो. रोजी सकाळी 11 वा.पासून रात्री 11 वाजेपर्यंत या स्पर्धा कुणकेश्वर येथे सुरू होत्या. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक कातवण येथील महापुरूष प्रासादिक भजन मंडळाने पटकावला. तर उत्तेजनार्थ बक्षीस मुणगे येथील श्री भगवती वशिक प्रासादिक भजन मंडळाला मिळाले. उत्कृष्ट पखवाज वादक श्री समर्थ प्रासादिक भजन मंडळ कुणकेश्वरचे तुषार शिंदे यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट गायक आणि हार्मोनियम वादक म्हणून कुणकेश्वर येथील पावणादेवी प्रासादिक भजन मंडळाचे भजनीबुवा रवीकांत घाडी यांना बक्षीस मिळाले. खुडी येथील पंचरत्न प्रासादिक भजन मंडळाचे अक्षय मेस्त्री यांना उत्कृष्ट तबलावादक म्हणून पारितोषिक देण्यात आले. उत्कृष्ट झांझवादक हे बक्षीस दाभोळे येथील श्री सदानंद प्रासादिक भजन मंडळाचे आयुष राऊत यांना देण्यात आले. उत्कृष्ट कोरस म्हणून वेळगिवे येथील रामेश्वर पावणाई आई तुळजा भवानी महिला भजन मंडळाला गौरविण्यात आले. शिस्तबध्द संघाचे पारितोषिक कुणकेश्वर येथील काळंबादेवी प्रासादिक भजन मंडळाने पटकावले.
बक्षीस वितरण संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे, ज्येष्ठ भजनीबुवा विजय परब, श्री देव कुणकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, संदीप नाईकधुरे, पत्रकार गणेश जेठे, योगिता परब-पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षक सागर राठोड, संदीप मेस्त्री यांच्यासह हेमंत तवटे, श्री क्षेत्र कुणकेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश वाळके, सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, रामा बागवे, सुदर्शन फोपे, विकास गुरव, मयुर ठाकूर, प्रा. वैभव खानोलकर, नंदू पवार, विनायक कदम, अजित मुळम, रघुनाथ परब व अनेक मान्यवरांना गौरविण्यात आले. संतोष कानडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. इतर तालुक्यांमध्ये या स्पर्धांचे नियोजन लवकरच करण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले.

error: Content is protected !!