महिला रुग्णालयाच्या अपुऱ्या सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा करणार !

माजी खासदार निलेश राणे यांची ग्वाही
महिला रुग्णालयाला भेट देऊन स्वखर्चाने दिल्या खुर्च्या
प्रतिनिधी । कुडाळ : भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे भेट देऊन या रुग्णालयांमध्ये असलेल्या अपुऱ्या सुविधाची माहिती घेतली आणि तात्काळ रुग्णांना स्वखर्चाने आसन व्यवस्थेसाठी खुर्च्या प्रदान केल्या. या रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे माजी खासदार निलेश राणे यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले.
कुडाळ येथे जिल्हा महिला व बाल रुग्णालय असून या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर महिला व बाल यांच्यावर उपचार होत आहेत. त्यामुळे या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र या ठिकाणी अनेक सुविधा अपुरे आहेत या संदर्भात भाजपचे कुडाळ- मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांना माहिती समजल्यावर त्यांनी या रुग्णालयाला भेट दिली यावेळी त्यांनी बालरोग तज्ञ डॉ. कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. रुग्णालयात अनेक नेक सुविधा नसल्याबाबत डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. काही सुविधा शासनस्तरावरून पुरवणे अपेक्षित आहेत. असे त्यांनी सांगितले मात्र ज्या सुविधा सहकार्याने देता येतील या सुविधा आम्ही देऊ असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगून रुग्णांची आसन व्यवस्था करण्यासाठी तात्काळ खुर्च्या रुग्णालयाला दिल्या. इतर सुविधा शासन स्तरावरून सोडवण्यासाठी पाठपुरावा करून त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.
यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जिल्हा चिटणीस विनायक राणे, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर, अभी गावडे, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर, चांदणी कांबळी, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.