कुडाळ मध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ चा जागर

भव्य बाईक रॅली उत्साहात संपन्न
उपसभापती सीताराम तेली यांनी केला शुभारंभ
मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाचा टक्का उंचावणे आणि समाजात स्त्री – पुरुषांना समान दर्जा मिळवून देण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तर्फे कुडाळमध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कुडाळ येथील जिजामाता चौक ते पंचायत समिती दरम्यान काढण्यात आलेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
रॅलीचा प्रारंभ जिजामाता चौक येथे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती सीताराम तेली यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
यावेळी बोलताना त्यांनी स्त्री-भ्रूणहत्या रोखणे आणि मुलींना सक्षम करणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. तसेच कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी सुद्धा ही रॅली यशस्वी झाल्याचे सांगून बेटी बचाव बेटी पढाव योजनेचे महत्व अधोरेखित केले.
या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महिला कर्मचाऱ्यांसोबतच पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अशा घोषणांनी कुडाळचा परिसर दणाणून गेला होता.
उप सभापती सीताराम तेली, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, तालुका पशुसंवर्धन अधिकारी अभिजित कसालकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी मृणाल कार्लेकर, चंद्रसुभाष परब, श्री. खरात, संदेश परब, ललिता कासले, शर्मिला वसावे, अक्षय कानविंदे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
समाजामध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्ज्वल करावे, हा संदेश तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही रॅली मैलाचा दगड ठरली आहे, असेच म्हणावे लागेल.





