माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

विधान परिषदेत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मांडली लक्षवेधी

शिक्षणमंत्री दादा भूसे यांचे चौकशीचे आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि कामकाजातील दिरंगाईचे गंभीर आरोप झाले असून हा मुद्दा आता थेट विधान परिषदेत पोहोचला आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज विधान परिषदेच्या सभागृहात लक्षवेधी सूचना मांडत माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी या मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार करत असून त्यांच्यावर चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. तर एका अनुकंपा शिपाई भरती मध्ये एका विधवा महिलेकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करत आपल्याकडे या संदर्भातील ऑडिओ क्लिप असून पुरावा असल्याचा दावा केल्याने सभागृहात एकच खळबळ माजली. या घटनेने सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे. या भ्रष्टाचारी रॅकेटवर कारवाई करण्याची जोरदार मागणी आज विधान परिषदेमध्ये शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी या कोणालाच जुमानत नसून अनेक शिक्षक संघटनांच्या तक्रारी असून मला याचा प्रत्यय आल्याचा दावा करतबत्यांच्या निलंबनाच्या मागणीवर म्हात्रे शेवटपर्यंत ठाम राहिले.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्याविरोधात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून वारंवार तक्रारी येत असल्याचे सांगत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सभागृहात हा मुद्दा आज आक्रमकपणे मांडला. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची बिले दीर्घकाळ थकीत ठेवणे, पगार वेळेवर न करणे, प्रशासकीय कामांमध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई करणे, तसेच प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर फाईल तपासणीसाठी आणि क्लियर करण्यासाठी एजंटमार्फत व्यवहार केल्याचेही आरोप करण्यात आले.
एका विधवा महिलेने अनुकंपा तत्वावर आपल्या मुलाच्या नोकरीसाठी आणि मान्यतेसाठी स्वत:चे मंगळसूत्र विकून पैसे दिल्याचा धक्कादायक आरोपही सभागृहात मांडण्यात आला. पैसे घेऊनही काम न केल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार म्हात्रे यांनी संबंधित माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले असून दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असे सभागृहात स्पष्ट करण्यात आले.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर दिल्यानंतर पुन्हा याच लक्षवेधीवर चर्चा करावी, असे सभापती नीलम गोरे यांनी स्पष्ट केले. यावेळी हाच मुद्दा पकडत आमदार किशोर दराडे यांनी एका विधवेला आपले मंगळसूत्र विकून आपल्या मुलाची मान्यता देण्यासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतात, ही गंभीर गोष्ट आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून मान्यतेसाठी असे पैसे घेणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करा. मान्यतेची फाईल पूर्ण करण्यासाठी अजून खालच्या अधिकाऱ्यांनी 50 हजार रुपये मागल्याचा गंभीर आरोप आमदार किशोर दराडे यांनी केला. त्यामुळे सभागृह चांगलेच आवाक झाले.
दुसऱ्यांदा उपस्थित झालेल्या या लक्षवेधीवर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली. या संपूर्ण प्रकरणाची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून या समितीचा अहवाल 15 मार्च पर्यंत येणार आहे आणि या अहवालानंतर जर त्या दोषी आढळल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असाही इशारा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला. तसेच सभागृहात आमदारांना या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता सीईओ यांच्या चौकशी अहवालाकडे सिंधुदुर्गसह राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या गंभीरावर आरोपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे. गेल्या अनेक दिवस या शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. माध्यमिक शिक्षण विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचे आरोप सातत्याने होत होते. तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाचे विधान परिषदेत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अक्षरशः वाभाडे काढले. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागावर मुख्य कार्यकारी अधिकारी आता काय कारवाई करतात?आणि काय भूमिका घेतात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!