प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान

कुडाळ मध्ये पुरस्कार वितरण सोहळा

ज्येष्ठ अभिनेता प्रसाद पंडित यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

प्रतिभावान लेखक चिं त्र्यं खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद आहे. बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत असताना मराठी भाषा संवर्धनाची सुद्धा आज गरज आहे, असे प्रतिपादन कवी आणि गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनी केले. कुडाळचे बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा ‘आरती प्रभू पुरस्कार-२०२६’ सुप्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांना रविवारी सायंकाळी कुडाळ येथे झालेल्या शानदार समारंभात चिं. त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभू यांच्या जन्मदिनी प्रदान करण्यात आला. त्यावेळी प्रा. दवणे बोलत होते.
चिं त्र्यं खानोलकर तथा आरती प्रभू हे कुडाळचे सुपुत्र त्यामुळे सन २०१३ पासून कविता आणि नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कवी किंवा नाटककारास हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. आतापर्यंत १२ जणांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यंदाचा हा तेरावा आरती प्रभू पुरस्कार वितरण सोहळा येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या कै एकनाथ ठाकूर सभागृहात संपन्न झाला. आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष अनंत वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला आरती प्रभू पुरस्कार विजेते कवी प्रा. प्रवीण दवणे, ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित, अमेरिकास्थित प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिल नेरुरकर, कमशिप्र मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि बाबा वर्दम थियेटर्सचे संस्थापक चंदू शिरसाट व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, डॉ. अनिल नेरुरकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि प्रा. प्रवीण दवणे यांच्या हस्ते आरती प्रभू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
अभिनेते प्रसाद पंडित यांच्या हस्ते प्रा. प्रवीण दवणे यांनी आरती प्रभू २०२६ पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रुपये २१ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरणापूर्वी निलेश जोशी यांनी प्रा. प्रवीण दवणे याना दिलेल्या मानपत्राचे वाचन केले. डॉ. जी. एस. कुलकर्णी यांनी या मानपत्राचे लेखन केले होते. मानपत्र लेखन आणि वाचन याचे प्रा. प्रवीण दवणे आणि अभिनेते प्रसाद पंडित यांनी आपल्या मनोगतातून विशेष कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना प्रा. प्रवीण दवणे यांनी आरती प्रभू, त्यांचे लेखन, त्यांची प्रतिभा, आजची मराठी भाषा, भाषा संवर्धनाची गरज यावर भाष्य केले. आरती प्रभू यांची बरीचशी गाणी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केली. गानकोकिळा लता मंगेशकर, आशा भोसले यासारख्या दिग्गजांनी ती गायली. हा सारेच प्रतिभावान. म्हणून ती गाणी आज मराठी माणसाच्या हृदयात आहे. हि गाणी कानाचा डोळा करून पहिली गेली त्यामुळे आपल्याकडून मराठी भाषेकडे काढी कानाडोळा झाला नाही असे प्रा. दवणे यांनी सांगितले.
अभिनेते प्रसाद पंडित यांनी देखील यावेळी मार्गदर्शन करताना आरती प्रभू आणि त्यांचे प्रतिभा संपन्न लेखन याविषयी उहापोह केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आरती प्रभू यांच्या कवितांचे इंग्रजी भाषेत भाषांतर झाले असते तर कदाचित त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले असते,एवढी त्यांची प्रतिभा होती, असे प्रतिपादन केले. यावेळी डॉ. अनिल नेरुरकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबा वर्दम थियेटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ. संजीव आकेरकर यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन निलेश उर्फ बंड्या जोशी यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. जी. एस. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, प्रतिभा पाटणकर, कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष वालावलकर, संत राऊळ महाराज कॉलेजचे प्राध्यापक, बाबा वर्दम थियेटर्सचे सदस्य, साहित्यिक, वाचक आणि साहित्यप्रेमी रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!