तळेरेत ‘जडण घडण’ कार्यक्रमात ‘नारीशक्ती’चा जागर

सिंधू फाउंडेशन, अक्षरोत्सव परिवार,श्रावणी कम्प्युटर तळेरे यांचे आयोजन
“महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या आरोग्याची आणि प्रगतीचीही काळजी घेतली पाहिजे. तसेच, घरगुती स्तरावर छोटे व्यवसाय करताना त्याला व्यावसायिक शिस्त आणि स्वरूप दिल्यास महिला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होतील,” असे प्रतिपादन डॉ. अनिल नेरुरकर यांनी केले.
तळेरे येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘जडण घडण’ या विशेष कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राधाबाई गुरव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी डॉ. अनिल नेरुरकर आणि श्रावणी मदभावे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून त्यांना बोलते केले. केवळ घर आणि काम यात मग्न असणाऱ्या महिलांच्या मनात नेमके काय सुरू असते, त्यांना कोणत्या मार्गदर्शनाची गरज आहे, यावर या सत्रात प्रकाश टाकण्यात आला.
नारीशक्ती सन्मान सोहळा (चौकट)
याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना ‘नारीशक्ती सन्मानपत्र’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये: रिया चव्हाण, रेश्मा फाटक, ममता माळी, देवकी तळेकर, मनस्वी तळेकर, अनुजा सुतार, सिद्धी साटम, पल्लवी पाटील, राधाबाई गुरव, श्रुती कल्याणकर, राखी महाडिक तसेच ‘महालक्ष्मी प्लाझा सखी’ आणि ‘शिवशक्ती महिला कबड्डी संघ, बुरंबावडे’ यांचा समावेश होता.
अनेकांसाठी कार्यक्रम ठरला यादगार :
कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारे खेळ खेळताना महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दैनंदिन धावपळीतून विरंगुळा मिळाल्याने हा कार्यक्रम सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
भावूक क्षण आणि डोळ्यात अश्रू :
मनोगत व्यक्त करताना अनेक महिलांनी आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणी आणि संघर्षाचे प्रसंग सांगितले. या भावना ऐकून उपस्थित महिलांचे डोळे नकळत पाणावले. आपल्या मनातील साचलेल्या भावनांना वाट करून देताना महिलांसाठी हा एक हळवा क्षण ठरला.
या कार्यक्रमाला तळेरे परिसरातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी श्रावणी मदभावे, सतीश मदभावे, रिया चव्हाण, मनस्वी तळेकर, राधाबाई गुरव, राखी महाडिक, अनुजा सुतार आणि रेश्मा फाटक यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंधू फाउंडेशनचे डॉ. अनिल नेरुरकर, अक्षरोत्सव परिवाराचे निकेत पावसकर, श्रावणी कॉम्प्युटरचे सतीश मदभावे, श्रावणी मदभावे, अनु मदभावे, संजय खानविलकर आणि इतर सदस्यांनी विशेष सहकार्य केले.





