शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांना पदावरून कार्यमुक्त करावे – रुपेश पावसकर

कविता शिंपी यांची सुरु आहे चौकशी

माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. कविता शिंपी यांची सुरू असलेल्या चौकशी दरम्यान त्यांना पदावरून कार्यमुक्त करून दूर करावे अशी मागणी नेरूर देऊळवाडा जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे, ​माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. कविता शिंपी यांच्या भ्रष्टाचारा विरोधात महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 10 मार्च 2026 रोजी कोकणचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी एक लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीवर शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सुद्धा भ्रष्टाचाराचे मुद्दे उचलून धरले आणि श्रीमती कविता शिंपी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी तत्काळ या प्रकरणाची आपल्या मार्फत चौकशीच्या आदेश दिले आहेत. आपण याची नि:पक्षपातीपणे चौकशी करीत आहात. या सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे.
सौ. शिंपी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असून त्याबाबतची चौकशी सध्या सुरू आहे. त्या पदावर कायम असताना ही चौकशी नि:ष्पक्षपणे होणे कठीण आहे. सध्या त्या पदावर कार्यरत राहून त्या पुरावे नष्ट करणे, साक्षीदारांवर दबाव आणणे किंवा चौकशी प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शैक्षणिक क्षेत्रातील कामकाजात पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी, त्यांना त्यांच्या विद्यमान पदावरून कार्यमुक्त करून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती द्यावी, चौकशी संपेपर्यंत त्यांचे निलंबन करावे किंवा सक्तीच्या रजेवर पाठवावे. अशी मागणी रुपेश पावसकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!