बांदानगर पतसंस्थेच्या माजी संचालकांना कारावासाची शिक्षा

सिंधुदुर्ग ग्राहक आयोगाचा निकाल

दोघांच्या विरोधात पकड वॉरंट जारी

बांदा येथील बांदा नगर अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटी या सहकारी पतसंस्थेमध्ये विविध ठेविदारांनी ठेवलेल्या मुदत ठेवी संस्थेने परत न केल्याने ठेवीदारांनी सन 2008 ते 2010 चे दरम्यान पतसंस्थेविरुद्ध सिंधुदुर्ग ग्राहक मंचामध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. पतसंस्थेने आणि तत्कालीन संचालकांनी संयुक्तरीत्या ग्राहकांना त्यांच्या रकमा व्याजासह परत करण्याचे आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश तत्कालीन मंचाने दिले होते. परंतु तरीही पतसंस्थेने अगर संचालकांनी ग्राहकांची रक्कम व्याजासह परत न केल्याने दहा ग्राहकांनी सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचामध्ये फौजदारी तक्रारी दाखल केल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात पतसंस्थेवर अवसायकांची नेमणूक झाली, संचालकांनी उच्च न्यायालयामध्ये काही याचिका दाखल केल्या. त्यामुळे सदर प्रकरणांची गुंतागुंत वाढलेली होती. तदनंतर सदर प्रकरणांची सुनावणी कायदेशीररित्या पूर्ण झाल्यानंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सिंधुदुर्ग यांनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष, सहदेव सातार्डेकर यांना दहा प्रकरणांमध्ये, उपाध्यक्ष हनुमंत आळवे यांना नऊ प्रकरणांमध्ये, अन्य संचालक सुदन केसरकर, सतीश येडवे, राजन पेडणेकर, आनंद गवस या चौघांना प्रत्येकी दोन प्रकरणांमध्ये, महादेव वसकर यांना एका प्रकरणामध्ये, रश्मी सामंत यांना तीन प्रकरणांमध्ये एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. निकालाचे दिवशी केसरकर, येडवे, गवस, पेडणेकर आणि वसकर यांनी उपस्थित राहून ठेवीदारांची व्याजासह रक्कम जिल्हा आयोगात भरणा केल्याने जिल्हा आयोगाने त्यांना अपिलाचे कालावधीपर्यंत जामीन मंजूर केला आहे. सातार्डेकर, आळवे आणि सामंत हे निकालाचे दिवशी अनुपस्थित असल्याने त्यांचे विरुद्ध पकड वॉरंट जारी करण्यात आले आहे. सदरचे निकालपत्र जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्ष इंदुमती मलुष्टे आणि सदस्य योगेश खाडीलकर यांनी पारित केले. आयोगाच्या या निकालाने संबंधितांना जोरदार दणका मिळाला आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!