कुडाळात १७ ला स्पर्धा परीक्षा आणि जीएसटी बाबत मोफत मार्गदर्शन

ऍड गणेश दळवी करणार मार्गदर्शम

मंदार शिरसाट, एमआयडीसी असोसिएशन यांचा पुढाकार

कुडाळ शहरातील व्यापारी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत दोन महत्त्वपूर्ण थेट संवाद मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परिक्षांबाबत चर्चासत्र तर उद्योजक व व्यापा-यांसाठी जीएसटी कर प्रणाली या विषयावर चर्चासत्र होणार आहे. या दोन्ही चर्चासत्रांना निवृत्त उपआयुक्त (GST) अॅड. गणेश बाळकृष्ण दळवी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या संकल्पनेतून मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथे आज मंदार शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहीती दिली.
या पत्रकार परिषदेला सीए. सागर तेली, असोसिएशनचे आनंद बांदिवडेकर, लायन्स क्लब अध्यक्ष आनंद कर्पे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे मनोज वालावलकर, संदीप म्हाडेश्वर, अमित राणे आदी उपस्थित होते.
मंगळवार दि.१७ मार्च रोजी सकाळी १०.१५ वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे UPSC, MPSC आदी स्पर्धा परीक्षांबाबत विशेष मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या मार्गदर्शन सत्रातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, अभ्यास पद्धती, करिअर संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तर याच दिवशी सायं. ४.१५ वाजता कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे व्यापारी व उद्योजकांसाठी जीएसटी कर प्रणाली संदर्भातील चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात जीएसटी कर प्रणाली, व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक बाबी तसेच व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमाला लायन्स क्लब ऑफ कुडाळ – सिंधुदुर्ग, रोटरी क्लब ऑफ कुडाळ, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट, कुडाळ तालुका व्यापारी संघटना तसेच एमआयडीसी असोसिएशन, कुडाळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. दोन्ही कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून व्यापारी, उद्योजक तसेच विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी मंदार शिरसाट मो.नं. ९४०५८१२१२१ यांच्याशी संपर्क स्धावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!