कलमठ सुतारवाडी पिंपळपार येथे धोकादायक उच्चदाब वाहिन्यांविरोधात धीरज मेस्त्री यांचे उपोषण

कलमठ सुतारवाडी पिंपळपार येथील सभामंडपावरून जाणाऱ्या धोकादायक उच्चदाब विद्युतभरीत वाहिन्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षाविरोधात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी उद्या 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे.
सदर ठिकाणी दररोज १०० ते १५० ग्रामस्थांचा वावर असतो. मात्र, वारंवार निवेदन, पत्रव्यवहार, स्थळ पाहणी व कायदेशीर नोटीस देऊनही महावितरण व संबंधित विभागांकडून फक्त दिखाऊ व तकलादू उपाययोजना करण्यात आल्याचा आरोप मेस्त्री यांनी केला आहे. अशा प्रकारचा ठेकेदार व बोगस विकास हा थेट सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
या गंभीर बाबींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी, नागरिकांच्या जीवित हक्कासाठी आणि ठेकेदार विकासाच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांचे हे उपोषण असणार आहे.
हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती किंवा विभागाच्या विरोधात नसून, गावाच्या व येणाऱ्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी असल्याचे धीरज मेस्त्री यांनी स्पष्ट केले आहे. सर्व सुजाण ग्रामस्थ, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या आंदोलनास प्रत्यक्ष उपस्थित राहून नैतिक पाठिंबा द्यावा, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
“आज जर आपण शांत राहिलो, तर उद्या एखादी दुर्घटना घडल्यास फक्त पश्चात्ताप उरेल,” असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

error: Content is protected !!