‘कोकण नाऊ’ने सामाजिक बांधिलकी जपली !
विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब यांचे गौरवोद्गार, डबलबारी, दशावतार, क्रीडा स्पर्धा, फन फेअर, एंटरटेनमेंट शो, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
कुडाळ : कोकणचे नंबर १ चॅनेल ‘कोकण नाऊ’च्या वतीने ‘कोकण नाऊ महोत्सव २०२३’ ला कुडाळ हायस्कुल, कुडाळच्या भव्य मैदानावर दिमाखात सुरुवात झाली. येत्या ११ एप्रिलपर्यंत या हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी कुडाळच्या नगराध्यक्षा आफ्रिन करोल आणि उप नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. कुडाळच्या नगराध्यक्षा आफ्रिन करोल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महोत्सवाला सुरुवात झाली.
यावेळी व्यासपीठावर नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका सई काळप, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेविका अक्षता खटावकर, नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेविका नयना मांजरेकर, कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल, मनसे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, श्रीपाद तवटे आदी मान्यवर उपस्थित होते. मालवणच्या स्वराज्य संघटनेच्या ढोलपथकाने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी या महोत्सवाचे मुख्य उद्घाटक युवा उद्योजक विशाल परब आपल्या भाषणात म्हणाले की, आज कोकण नाऊची झालेली प्रगती उल्लेखनीय आहे. २०१६ मध्ये कोकण नाऊची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागातील बातम्यांद्वारे नागरिकांपर्यंत कोकण नाऊ पोहोचले. आज मुंबईसारख्या मोठ्या शहरात असलेल्या कोकणातील चाकरमान्यांपर्यंत कोकण नाऊ पोहोचले आहे. कोकणातील इत्यंभूत बातम्या आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोकण नाऊने अधिक परिश्रम घेतलेत. त्यामुळे आज कोकण नाऊ यू-ट्यूबच्या माध्यमातून विदेशातही पाहिले जाते. त्यामुळे ‘कोकण नाऊ’ने आता ‘आज तक’ प्रमाणे व्हावे, असे प्रतिपादन विशाल परब यांनी केले.
केवळ बातम्या प्रसारित न करता कोकण नाऊने कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपली. लाईव्ह दशावतार, डबलबारी, भजन, कीर्तन, क्रिकेट स्पर्धा यांच्या माध्यमातून कोकण नाऊने कोरोना काळात नागरिकांना घर बसल्या बातम्या आणि मेजवानी दिली. यासाठी कोकण नाऊचे सर्वेसर्वा विकास गावकर आणि त्यांच्या टीमची विशेष मेहनत होय. म्हणूनच कोकण नाऊ हे कोकणचं नंबर १ चे चॅनेल आहे. येत्या काळातही सामाजिक उपक्रमांमधून कोकण नाऊ अग्रेसर असेल असा विश्वास युवा उद्योजक विशाल परब यांनी व्यक्त केला. तर आजपासून कुडाळमध्ये सुरु झालेल्या या महोत्सवाला सुद्धा पुढील १० दिवसात गर्दी मोठ्या प्रमाणात होईल, असेही विशाल परब म्हणाले.
तर यावेळी कुडाळ शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा आफ्रिन करोल यांनी सुद्धा कोकण नाऊच्या महोत्सवाला शुभेच्छा देताना आज कोकण नाऊची विश्वासार्हता टिकून असून खरी बातमी म्हणजे कोकण नाऊ, असे समीकरण होय. आज या महोत्सवाच्या माध्यमातून कुडाळवासीयांना वेगळी पर्वणी साधून आली असून याबाबत त्यांनी कोकण नाऊचे आभार मानले. यावेळी उप नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी कोकण नाऊ महोत्सवास शुभेच्छा देताना म्हटले की, आज कुडाळमधील स्थानिक बातम्या केवळ कोकण नाऊ प्रसारित करते. त्यामुळे येथील नागरिकांचा कोकण नाऊवर विश्वास आहे.
यावेळी कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी सुद्धा कोकण नाऊबद्दल प्रेम व्यक्त करताना कोरोना काळात सिंधुदुर्गात आर्थिक फटका बसला. कोरोना काळात दशावतार, भजन, डबलबारी यांच्या माध्यमातून कोकण नाऊने एक व्यासपीठ निर्माण केले. यामुळेच आजचा दिवस महत्वाचा आहे. भविष्यात सुद्धा अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून कोकण नाऊ आणखी प्रगती करेल, असा विश्वास दादा साईल यांनी व्यक्त केला.
यावेळी कोकण नाऊचे संचालक विकास गावकर यांनी स्थापनेपासूनची कोकण नाऊची प्रगती कशी होत गेली, याची थोडक्यात माहिती दिली. आज कोकण नाऊची टीम एकत्रित काम करीत असून त्यामुळेच हे यश संपादन झाले आहे. या चॅनेलला यूट्यूबकडून ‘सिल्व्हर बटण’ देऊन गौरविण्यात आले आहे, हीच आमच्या कामाची पोचपावती होय. कोरोना काळात कोकण नाऊने भजन, डबलबारी, दशावतार यांना व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे आमची विश्वासार्हता टिकून आहे, असे संचालक विकास गावकर म्हणाले.
यावेळी कोकण नाऊचे मेघनाथ सारंग, योगेश खाडे, रोहन नाईक, निलेश जोशी, मयूर ठाकूर, हर्ष राऊत, अमेय सुर्वे उपस्थित होते. या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गुरव तर आभार मयूर ठाकूर यांनी मानले.
आज, ३ एप्रिल रोजी कोकण नाऊ अंडरआर्म प्रीमियर लीग २०२३ भव्य बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा (पहिला दिवस). दिनांक ४ एप्रिल रोजी कोकण नाऊ अंडरआर्म प्रीमियर लीग(दुसरा दिवस). दिनांक ५ एप्रिल रोजी कोकण नाऊ अंडरआर्म प्रीमियर लीग (तिसरा दिवस), ६ एप्रिल रोजी हनुमंत जयंतीनिमित्त “आमने-सामने डबलबारी”यामध्ये बुवा गुंडू सावंत विरुद्ध बुवा दिनेश वागदेकर.
दिनांक ७ एप्रिल 2023 रोजी श्रीदेवी यक्षणी दशावतार नाट्यमंडळ यांचा दशावतारी नाट्य प्रयोग “श्वेतवान मणिपाल”. दिनांक ८ एप्रिल “खेळ पैठणीचा” (नाव नोंदणीसाठी संपर्क९३७०४४०८९३). दिनांक ९ एप्रिल २०२३ बाळकृष्ण दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग “दैव जाणिले कोणी”. दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी गायन स्पर्धा आणि या गायन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क ८४०८९२९९२३ आणि ९३७०४४०८९३ या दिवशीच विशेष आकर्षण गायक ध्रुव विजयकुमार गोसावी यांचा “संगीत रजनी”. दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी “भव्य सांस्कृतिक कार्यक्रम” होणार आहे.
कोकण नाऊ महोत्सव २०२३ या महोत्सवामध्ये अशाप्रकारे विविध सांस्कृतिक, धार्मिक,सामाजिक कार्यक्रमाचे, भव्य आयोजन करण्यात आले आहे. तसेच फनफेअरच्या माध्यमातून आणि रोबोटिक ॲनिमल यांच्या माध्यमातून लहान मुलांचे विशेष मनोरंजन देखील यामध्ये होणार आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ