दोनवेळा महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी संशयीत आरोपीला जामीन मंजूर

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद
यापूर्वी एकदा लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटकपूर्व जामीन मिळालेल्या संशयीत आरोपी राजेंद्र मधुकर फाटक याच्यावर पुन्हा एप्रिल 2025 मध्ये पुन्हा त्याच महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर झालेल्या या दुसऱ्या गुन्ह्या प्रकरणी संशयित आरोपीला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले. याबाबत हकीकत अशी की मुंबईतील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राजेंद्र मधुकर पाठक कल्याण, ठाणे मूळ राह. देवगड याला सिंधुदुर्ग ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 तथा विशेष न्यायाधीश एस एस जोशी यांनी अटकपुर्व जामीन मंजुर केला होता.
फेब्रुवारी २०२३ मधे आरोपीने फिर्यादी युवतीला लग्नाचे आमिष दाखवून देवगड येथील आपले गावी आणून तसेच त्यानंतर सन २०२३ ते २०२४ या कालावधीत वैभववाडी व मुंबई येथील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन जबरदस्ती वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबाबत फिर्यादीने दिनांक २९/१०/२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरून वैभववाडी पोलिस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 115(2), 352, 64,64(2)(m), 318(1), 318(3) व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(r)(s), 3(1)(w)(i)(ii), 3(2)(va) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन त्याला 50 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आरोपी व फिर्यादी जानेवारी २०२५ मधे एकत्र राहिले. आरोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवत परत तिचेवर अत्याचार केला, गर्भवती केले व मारहाण करून निघून गेला म्हणून आरोपीविरुद्ध २१ एप्रिल २०२५ रोजी कणकवली पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 115(2),64(2)(m), 69 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(r)(s), 3(2)(v), 3(2)(va) अन्वये फिर्याद दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
जामीन अर्जावर युक्तिवाद झाल्यानंतर संशयित आरोपीस ५० हजारांचा सशर्त जामिन मंजूर करताना सिंधुदुर्ग ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 तथा विशेष न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी आरोपीने फिर्यादी अथवा साक्षीदारावर दबाव आणू नये, त्याना धमकावू नये, सरकारी पक्षाच्या पुराव्यात ढवळाढवळ करू नये आदी अटी घातल्या आहेत. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला.