बुद्धिबळ जागतिक दिनानिमित्त श्री चेस अकॅडमीत विविध उपक्रमांची उत्साहवर्धक मेजवानी

कणकवली/कुडाळ | 20 जुलै 2025 – जागतिक बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून श्री चेस अकॅडमी, कणकवली व कुडाळ शाखांमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवार, 20 जुलै रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात चित्रकला, निबंध लेखन, वक्तृत्व, तसेच जलद बुद्धिबळ स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा समावेश होता.
या उपक्रमात अकॅडमीतील कणकवली व कुडाळ शाखांमधील ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत, बुद्धिबळ दिन आनंदात व उत्साहात साजरा केला. स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ विषयक आवड, विचारशक्ती आणि सर्जनशीलता यांना चालना मिळाली.
कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणात मालवणमधील सुप्रसिद्ध बुद्धिबळपटू आदित्य गोलतकर यांची सदिच्छा भेट ठरली. त्यांनी दोन्ही शाखांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या बुद्धिबळ कारकीर्दीसाठी प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये राजेंद्र तवटे सर, वीरेंद्र नाचणे सर, कारेकर सर, म्हापसेकर सर, घाडी सर, मोबारकर सर यांच्यासह इतर अकॅडमीचे शिक्षक, पालक व स्वयंसेवक यांनी मोलाची भूमिका बजावली.
कार्यक्रमास जयेश मालंडकर, हेमंत राणे व सुयोग धामापूरकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी वरद तवटे, मीनल सुलेभावी, तनिष्का सातवसे, गार्गी सावंत, गार्गी आजगावकर, आराध्य तुळसुलकर, सान्वी कारेकर, तनिष्का आडेलकर यांनी बुद्धिबळ दिनासंदर्भात मनोगत व्यक्त करत वातावरण मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सांगता करताना श्री चेस अकॅडमीचे संचालक श्री श्रीकृष्ण आडेलकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे व सहकाऱ्यांचे आभार मानले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सहभागी विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे व सन्मानपत्रे देऊन गौरविण्यात आले.