उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सामाजिक सप्ताह

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 60/ 40 चा फॉर्मुला वापरावा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील वजनदार राजकीय नेते आहेत. २२ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सामाजिक सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात जिल्हाभरात विविध समाजपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. आपला पक्ष सत्तेतील महत्त्वाचा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांने पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वतःला ऍक्टिव्ह करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी वेंगुर्ले येथे घेण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत केले.
कॅप्म येथील महिला औद्योगिक सहकारी काथ्या उद्योगाच्या सभागृहात अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष नाईक बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम, के, गावड़े, जिल्हा महिलाध्यक्ष प्रज्ञा परब, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष रवींद्र पावसकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, संदीप राणे, जिल्हा युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष उमाकांत वारंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अस्लम खत्तीप, अल्पसंख्यांक सेलचे महासचिव शफीक खान, व्हीजेएनटीचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार, कामगार सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, अपंग सेल जिल्हाध्यक्ष साबाजी सावंत, जिल्हा महिला उपाध्यक्ष मानसी देसाई, दोडामार्ग तालुका महिलाध्यक्ष यारिणी देसाई, कुडाळचे उपाध्यक्ष विराज बांदेकर, इमरान शेख, शहर अध्यक्ष गणेश चौगुले, केदार खोले, सावंतवाडी महिलाध्यक्ष रिद्धि परब तसेच संतोष राऊळ, सुशील चमणकर, जिल्हा सचिव सुजाता शेटकर, वेंगुर्ले तालुका महिला चीटणीसविमल पावसकर, दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष दीपक देसाई, तालुका सरचिटणीस व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते या सभेस उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवून देण्याची आता वेळ आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करण्याची आता नितांत गरज आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. राज्याचे अर्थमंत्री या नात्यानेही त्यांनी कोकणाला झुकते माप देत येथील असंख्य विकासकामांना निधीची पूर्तता केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या या वजनदार माणसाचा वाढदिवस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एखाद्या बुस्टप्रमाणे उपयोगी ठरेल. हीच ती वेळ आहे जागृत होण्याची. येणारा काळ पंचायत राजच्या निवडणुकांचा काळ आहे. त्यामुळे विविध मतदारसंघात आपले वजन वाढविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत इच्छूक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात संपर्क वाढवावा म्हणजे आपली ज्या ठिकाणी
ताकद दिसेल तो मतदारसंघ महायुतीत आपल्या पक्षासाठी सोडला गेला पाहिजे यासाठी आग्रही भूमिका घेता येईल. अजित पवार यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हयात ठिकठिकाणी आठवडाभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय जिल्हा कार्यकारिणीने घेतला आहे. त्यामुळे तात्काळ या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा आदी समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या गरजू रुग्णांना शस्रक्रियेची गरज आहे त्यांच्यावर संपूर्णपणे मोफत उपचार करण्याची यंत्रणाही उभारण्यात येईल, असेही पुढे बोलताना अबीद नाईक म्हणाले.
अजित पवार यांचा वाढदिवस म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक उत्साहाचा क्षण आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित सामाजिक सप्ताह साजरा करणे ही खुप मोठी गोष्ट आहे. आम्हाला आमची ताकद दाखवून देण्यासाठी आतातरी जागृत झाले पाहिजे, आठवडाभर विविध कार्यक्रम साजरे करताना समाजहित लक्षात घेऊन जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करूया. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप मोठा भाऊ म्हणून त्यांचा ४० टक्के वाटा आहे. उर्वरीत ६० टक्के वाटा शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला जातो. हाच फार्म्युला येणाऱ्या सर्वच निवडणुकांसाठी वापरात यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी यासाठी आम्ही सर्वजणच प्रयत्न करू, असे मार्गदर्शन यावेळी बोलताना प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी पदाधिकाऱ्यांना केले. महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परव यांनीही मार्गदर्शन केले.
कणकवली प्रतिनिधी