वेंगुर्ले दुय्यम निबंधक यांनी गुजराती ठक्कर यांच्या खरेदीखत व शेतकरी दाखल्याची चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्याने वैभव नाईक व दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे

न्याय मिळेपर्यंत शिरोडकर कुटुंबीयांसोबत राहणार – वैभव नाईक

आमच्या न्यायासाठी वैभव नाईक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत स्थानिक जमीन मालकांकडून समाधान व्यक्त

           माजी आमदार वैभव नाईक व सहकाऱ्यांनी  दाभोली गावडेवाडी येथील स्थानिक जमीन मालक असलेल्या शिरोडकर कुटुंबियांसमवेत आज वेंगुर्ले सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये धडक देत ठिय्या आंदोलन केले. गुजरातच्या यशवंत अमरतलाल ठक्कर याने सादर केलेल्या शेतकरी दाखल्याची सत्यता न पडताळताच त्याच्या नावे दाभोली येथील जमिनीचे बोगस खरेदीखत करून दिल्याप्रकरणी वेंगुर्ले दुय्यम निबंधक एन. पी. चौगुले यांना याबाबत जाब विचारण्यात आला. त्यावेळी उपस्थित असलेले वेंगुर्ले तहसीलदार विनायक वारंग यांनाहि याबाबत विचारणा करण्यात आली.  दुय्यम निबंधक पदाचा चार्ज देण्यात आलेल्या क्लार्क ने हे खरेदीखत केले आहे हे समजताच वैभव नाईक यांनी संताप व्यक्त केला. जोपर्यत या खरेदीखताची चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालयातून उठणार नाही असा इशारा  वैभव नाईक यांनी दिल्यानंतर  दुय्यम निबंधक एन. पी. चौगुले यांनी वेंगुर्ले तहसीलदार यांना पत्र लिहून यशवंत अमरतलाल ठक्कर याने सादर केलेल्या शेतकरी दाखल्याची सत्यता पडताळण्याची मागणी केली. तसेच दुय्यम निबंधक यांनी ठक्कर याच्या खरेदीखताची चौकशी करण्याचे अश्वासन देत त्याबाबतचे लेखी पत्र दिल्याने माजी आमदार वैभव नाईक व स्थानिक जमीन मालकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. 

      यावेळी वैभव नाईक म्हणाले, गुजरातच्या यशवंत अमरतलाल ठक्कर याने गुजरातचा बनावट शेतकरी दाखल जोडून दाभोली येथील जमिनीचे खरेदीखत केले आहे. या जमीन व्यवहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. वेंगुर्ले  दुय्यम निबंधक पद रिक्त असताना केवळ १५ दिवसांसाठी ओरोस येथील क्लार्क असलेल्या  समिधा गोलतकर  यांना दुय्यम निबंधक चार्ज देऊन तेवढया कालावधीत त्यांच्याकडून  हे ७.५ कोटींचे  खरेदीखत करून घेण्यात आले. खरेदी खताच्या कागदपत्रांची पडताळणी न करताच खरेदीखत केले आहे. त्यामुळे समिधा गोलतकर यांची लाचलुचपत विभागाकडे आम्ही तक्रार करणार आहोत. वेंगुर्ले तहसीलदार विनायक वारंग व  दुय्यम निबंधक एन. पी. चौगुले यांनी आम्हाला त्या खरेदीखताची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. हा शिरोडकर कुटुंबीयांचा लढा आहे. आणि त्या लढयात आम्ही शेवटपर्यंत शिरोडकर कुटुंबीयांसोबत राहणार आहोत असे सांगितले. 

       यावेळी संजना शिरोडकर म्हणाल्या, गुजरातच्या यशवंत अमरतलाल ठक्कर याने बोगस कागदपत्रे देऊन जमीन खरेदी केली आहे. अधिकाऱ्यांनी आमची फसवणूक केली असून आम्हाला न्याय मिळवून देण्याची मागणी आम्ही माजी आमदार  वैभव नाईक यांच्याकडे केली आहे असे सांगितले. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी स्थानिक जमीन मालक करीत असून  वैभव नाईक आम्हाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल स्थानिक जमीन मालकांनी समाधान व्यक्त केले. 
      यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ  उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना जिल्हाप्रमुख  मंदार शिरसाट, कुडाळ शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, अमित राणे, बाळू पालव, सागर भोगटे,गुरु गडकर, दीपक सावंत, राजू घाडीगावकर, ग्रा. प सदस्य हर्षद परब, श्रीकृष्ण बांदवलकर, जमीन मालक संजना शिरोडकर, संतोष शिरोडकर, दिव्या शिरोडकर, राजश्री गावडे,आरती देसाई, प्रियांका गावडे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!