छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचा युनिस्कोच्या यादीत समावेश झाला ही अभिमानाची बाब

पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती
राज्य सरकारकडून जनहिताचे निर्णय
केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर समन्वयाने काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले सिंधुदुर्ग आणि ऐतिहासिक आरमाराची राजधानी असलेला विजयदुर्ग किल्ला यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची अधिकृत घोषणा झाली आहे.हा निर्णय प्रत्येक शिवप्रेमी आणि सिंधुदुर्गवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “शिवरायांच्या विचारांवर चालणारा खरा मावळा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.”असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनीही सातत्याने पाठपुरावा केला. तसंच, खासदार नारायण राणे यांनीही केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून या विषयास गती दिली, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“शिवरायांच्या स्थापत्यकलेचा वारसा जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. या यादीत समावेश झाल्यामुळे किल्ल्यांचे संवर्धन, पर्यटन वाढ, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जागतिक पातळीवर गौरव होणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांची संख्या आता वाढेल,” असेही राणे म्हणाले.
तसेच, “राज्य सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. हे निर्णय जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार काय काम करत आहे, हे विरोधकांनी समजून घेतले पाहिजे,” असे स्पष्ट शब्दांत राणे यांनी विरोधकांना सुनावले.