वाघेरी माजी पोलीस पाटील, माजी सरपंच व उपसरपंचांवर गुन्हा दाखल

बेकायदेशीर रित्या खाजगी जमिनीत बांधलेला कोंडवाडा पाडत असताना केला अटकाव
वाघेरी येथील सर्वे नंबर 55 मधील खाजगी जमिनीमध्ये बेकायदेशीर रित्या बांधलेला ग्रामपंचायतचा जीर्ण झालेला कोंडवाडा पाडत असताना या ठिकाणी येत जेसीबी फोडून टाकू अशी धमकी देऊन या ठिकानी जेसीबी व ट्रॅक्टर अडवून ठेवल्याप्रकरणी माजी पोलीस पाटील अनंत राणे, माजी सरपंच संतोष राणे व उपसरपंच आणि दोन व्यक्ती यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत वैशाली महादेव पाटील (51 बावशी शेळीचीवाडी) सध्या घाटकोपर मुंबई यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. हा प्रकार आज बुधवारी सकाळी 8.30 वाजता घडला. वैशाली महादेव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, वाघेरी येथील त्यांच्या मालकीच्या सर्व्हे नंबर मध्ये आयनल येथील रोहित माने यांच्या जेसीबीने सपाटीकरण सुरू असताना संशयित आरोपी अनंत राणे, संतोष राणे व उपसरपंच यांनी येथे जेसीबी ऑपरेटर याला काम थांबवण्यास सांगत जेसीबी तोडून टाकू अशी धमकी दिली. यावेळी जेसीबी ऑपरेटर हा काम थांबवून तिथून निघून जात असताना संशयित आरोपींनी त्याला तू येथून जेसीबी न्यायचं नाही असे सांगत जेसीबी व ट्रॅक्टर अडवून ठेवला. यावेळी अनंत राणे व संतोष राणे यांनी अन्य तिघांना बोलावून घेतले. हा ग्रामपंचायतीचा कोंडवाडा असून येथे तुम्हाला उभे करणार नाही अशी धमकी संशयित आरोपींनी दिल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता 189 (1), (2), 126 (2), 351 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास हवालदार उत्तम वंजारे करत आहेत.
दिगंबर वालावलकर /कणकवली