अचानक एसटी फेऱ्या रद्द केल्याने साकेडीत सोमवारी एसटी रोखली

गेले तीन दिवस करूळ हायस्कूलला जाणाऱ्या मुलांचा होतोय खोळंबा
अखेर एसटीच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनाअंती ग्रामस्थांचे आंदोलन मागे
सरपंच सुरेश साटम यांची एसटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा
कणकवली साकेडी मार्गे कोंड्ये जाणारी सकाळी 9.30 वाजताची एसटी फेरी ही शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असताना गेले तीन-चार दिवस ही कोणतेही पूर्वकल्पना न देता ही एसटी फेरी अचानक बंद करण्यात आल्याने आज संतप्त झालेल्या साकेडी ग्रामस्थांनी साकेडी बौद्धवाडी या ठिकाणी 12.10 वा. ची कणकवली साकेडी एसटी रोखून धरली. अखेर एसटीचे अधिकारी परब यांच्याशी झालेल्या चर्चेअंती यापुढे अशी अनियमितता होणार नाही अशी ग्वाही दिल्यानंतर ही बस फेरी मार्गस्थ करण्यात आली. यावेळी एसटीच्या भोंगळ कारभारामुळे मात्र प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका. या विद्यार्थ्यांसाठी सोडण्यात येणाऱ्या एसटी नियमित सोडा अशी मागणी यावेळी सरपंच सुरेश साटम यांनी केली. साकेडी मार्गे जाणारी सकाळी 9.30 वाजताची एसटी फेरी गेले तीन दिवस अचानक बंद करण्यात आल्याने तीन दिवस विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. करूळ हायस्कूल या ठिकाणी जाणारे अनेक विद्यार्थी या ही एसटीची फेरी रद्द केल्यामुळे त्यांची शाळेला दांडी बसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून कोणतीही पूर्वकल्पना न देता ही एसटी फेरी बंद केल्याने आज साकेडी मधील ग्रामस्थ संतप्त झाले. अखेर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दुपारी बौद्धवाडी या ठिकाणी एसटी रोखून धरली. तसेच जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या एसटी फेरीचा निर्णय होत नाही तोपर्यंत ही एसटी सोडणार नाही असा इशारा देखील दिला. अखेर याबाबत माहिती मिळतात सरपंच सुरेश साटम ही घटनास्थळी दाखल झाले. साटम यांनी संबंधित अधिकारी परब यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यापूर्वी बौद्धवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव यांनी देखील श्री परब यांच्याशी चर्चा केली होती. मात्र पंढरपूर येथे एसटीच्या जादा फेऱ्या सोडल्याने एसटी चा तुटवडा भासत असून यापुढे साकेडी येथे सोडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या एसटीमध्ये अनियमितता होणार नाही याची मी स्वतः काळजी घेतो अशी ग्वाही श्री परब यांनी दिली. यावेळी श्री साटम यांनी अशा फेऱ्या रद्द करत असताना आगाऊ ग्रामपंचायतला कल्पना द्या. व शालेय फेऱ्या रद्द करू नका. शालेय फेऱ्या रद्द केल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण राहणार? या एसटी फेरीवर करूळ हायस्कूलला जाणारी मुले तसेच कोंडये वरून करूळ पर्यंत येणारी मुले देखील अवलंबून आहेत. त्यामुळे या एसटी फेरी रद्द करताना तुम्ही देखील विचार केला पाहिजे असे श्री. साटम यांनी सांगितले. अखेर श्री. परब यांनी दिलेल्या ग्वाही नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रेरणा जाधव, विनोद जाधव, मंगेश जाधव, मिलिंद जाधव, सुधाकर जाधव, महिला व ज्या विद्यार्थ्यांचे गेले तीन दिवस शैक्षणिक नुकसान झाले ते विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी झाले होते.
दिगंबर वालावलकर कणकवली