लग्नाचे आमिष दाखवून कणकवलीतील महिलेवर वर्षभर बलात्कार

संशयित तरूणाला शिवाजीनगर येथील घरातून अटक
कणकवलीतील एका फ्लॅट व मुडेडोंगरी येथे नेत बलात्कार
लग्नाचे अमिष दाखवून कणकवली शहरातील एका महिलेवर शहरातीलच एका तरूणाने वर्षभर बलात्कार केला. तशी फिर्याद त्या महिलेने आज कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर संशयित तरूणाला कणकवली पोलिसांनी तातडीने घरी जाऊन ताब्यात घेतले आहे. सौरव बाबुराव बर्डे (वय ३१, रा.शिवाजीनगर कणकवली) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरूणाचे नाव आहे.
सौरव बर्डे याची वर्षभरापूर्वी त्या महिलेशी मैत्री झाली. या मैत्रीचा फायदा घेऊन तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून सौरव याने कणकवली शहरातील एका फ्लॅटवर तसेच आशिये रोड येथील एका फ्लॅटवर नेऊन शारीरिक संबंध ठेवले. तसेच अनेकवेळा मुडेडोंगरी येथेही नेऊन बलात्कार केला. असे त्या महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. या महिलेच्या तक्रारीनुसार आज सकाळी सौरव बर्डे याला कणकवली शहरातील शिवाजी नगर येथील घरातून पोलिसांनी अटक केली. दुपारी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. महिलेवर अत्याचार प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे करत आहेत.
दिगंबर वालावलकर कणकवली