रामेश्वर वाचन मंदिराचा १३१वा वर्धापन दिन उत्साहात वाचू आनंदे उपक्रमाने कार्यक्रमात रंगत आणली.

आचरा येथील रामेश्वर वाचन मंदिराचा १३१वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आयोजित अभिवाचन कार्यक्रमात सहभागी १२जणांनी वाचन, कविता सादरीकरणातून या वर्धापन दिनाला रंगत आणली.
कार्यक्रमाची सुरुवात जनता विद्यामंदिर त्रिंबकचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली.यावेळी साहित्यिक सुरेश ठाकूर, वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्रीमती वैशाली सांबारी,जयप्रकाश परुळेकर, भिकाजी कदम,माजी केंद्र प्रमुख सुगंधा गुरव,सांस्कृतिक समितीच्या सौ श्रद्धा महाजनी,सौ कामिनी ढेकणे,भावना मुणगेकर, विलास आचरेकर, ग्रंथपाल सौ विनिता कांबळी यांसह अन्य मान्यवर ,कर्मचारीउपस्थित होते.यावेळी आयोजित वाचू आनंदे उपक्रमांतर्गत कु नुर्वी शेंटगे हिने सानेगुरुजी यांच्या श्यामची आई पुस्तकातील कथा वाचून कार्यक्रमाची सुरुवात रंगतदार केली.यानंतर मंदार सांबारी यांनी सुरेश ठाकूर यांच्या शतदा प्रेम करावे या पुस्तकातील ग्रंथपाल काका दळवी व्यक्ती चित्रणात्मक लेखातून एका ग्रंथनिष्ठ व्यक्तीमत्त्वाचा आदर्श उभा केला.यानंतर भावना मुणगेकर यांनी इंदिरा संत यांची गवतफुला कविता सादर केली.ग्रंथपाल विनिता कांबळी यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या आशा एक सुरेल झंझावात या आशा भोसले यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकातील उद्बोधक प्रसंगाचे वाचन केले.यानंतर अर्जुन बापर्डेकर यांनी काही राहून तर गेले नाही ना ही कविता सादर करत जीवन जगत असताना काही सुटलेले मनाला चटका देणारया क्षण काव्यातून व्यक्त केले.
माजी केंद्र प्रमुख सुगंधा गुरव यांनी सानेगुरुजी यांच्या शामची आई मधील कथा वाचन केले . त्यानंतर सुरेश ठाकूर यांनी सादर केलेल्या विनोदी किस्स्यांनी उपस्थितांना खळखळून हसवले.नरेंद्र कोदे यांनी आचरा गाव लय भारी ही स्वरचित कविता सादर केली.सुरेंद्र सकपाळ यांनी स्वलिखित अनुभवलेली काश्मीर सहल अनुभव कथन केले.प्रथमच अभिवाचन करणारया भिकाजी कदम यांनी शब्द फुलोरा कथावाचन केले.अशोक कांबळी यांनी अश्रूंची झाली फुले नाटकातील प्रवेश सादर केला.तर बाबाजी भिसळे यांनी हसतच रव कविता सादर केली.
कार्यक्रमाचा समारोप ज्ञानेश्वरी मधील विवेचनासह ओवीने करण्यात आले.