लवकरच सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करणार!

भजनी कलाकार संस्थेचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांची घोषणा
बुवा रविकांत राणे यांच्या निवासस्थानी गुरु पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा
भजन कलाकार संस्थेच्या माध्यमातून श्रावणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तरुण भजनी कलाकार यांना उच्च दर्जीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कोकण नाऊ चॅनल व सिंधुदुर्ग जिल्हा भजन कलाकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भजन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा असे आवाहन भजनी कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व कलाकार मानधन समितीचे जिल्हाध्यक्ष बुवा संतोष कानडे यांनी केले. कणकवली तालुक्यातील जाणवली येथे बुवा रविकांत राणे यांच्या निवासस्थानी जिल्हास्तरीय गुरुपौर्णिमा उत्सव व संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी बुवा श्री कानडे बोलत होते. यावेळी दैनिक पुढारी वृत्तपत्राचे जिल्हा आवृत्तीप्रमुख गणेश जेठे, ज्येष्ठ संगीततज्ञ माधव गावकर, कणकवली तालुका भजन सांप्रदायिक संस्थेचे संचालक शेखर चव्हाण,सचिव निलेश ठाकूर,प्रसिद्ध भजनी बुवा योगेश पांचाळ,बुवा रामा बागवे, पखवाज वादक हेमंत तवटे असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य भजनी कलाकार उपस्थित होते.
यावेळी बुवा संतोष कानडे यांनी संस्थेच्या माध्यमातून राबवीत असलेल्या विविध योजनांची माहिती देत रवीकांत राणे बुवा यांना शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध भजनी बुवा रविकांत राणे यांच्या निवासस्थानी गुरु पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोकण कलाभूषण भजन सम्राट कै.बुवा श्री चंद्रकांत कदम यांची गुरुपौर्णिमा मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन रविकांत राणे बुवा यांनी केले होते. रविकांत राणे बुवा हे दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन करून विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात.मागील वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलेमध्ये कार्य करणारे कलाकार यांचा सन्मान गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने करण्यात आला होता. तर यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकार तसेच कणकवली शहरांमध्ये भजनी कलेचे क्लास घेत असलेल्या गुरुवर्यांचा सत्कार बुवा रवी राणे यांच्याकडून करण्यात आला.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुण भजनी कलाकार उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पुढारीचे आवृत्ती प्रमुख गणेश जेठे म्हणाले, आपल्या जिल्ह्याचा क्राईम रेट हा अतिशय कमी आहे.काही अपवाद वगळता तरुण पिढी ही सामाजिक धार्मिक,सांस्कृतिक,शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करताना दिसत आहे. आणि या सर्व पाठीमागे जर कुठली शक्ती असेल तर ती म्हणजे कोकणातील भजन कलेकडे असलेला ओढा.कारण भजनीकला ही स्वच्छ जीवन जगायला शिकवते.तसेच परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा हा एक उत्तम असा मार्ग आहे. तसेच भजन या कलेेकडे तरुणांचा ओढा मोठ्या प्रमाणावर सिंधुदुर्गात असल्यामुळे इथले तरुण हे ईश्वरसेवेच्या मार्गाकडे वळले आहेत. असे ते म्हणाले. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना माधव गावकर यांनी देखील उपस्थित भजनी कलाकारांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध भजनी बुवा सुंदर मेस्त्री आणि बुवा सुजित परब यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम देखील यावेळी संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे सचिव बुवा गोपीनाथ लाड यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याभरातून अनेक भजनी बुवा व त्यांना संगीत साथ देणारे वाद्यवृंद देखील उपस्थित होते.