महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांची सतर्कता

सावंतवाडी वरून चोरीला गेलेली मोटरसायकल सापडली
चोरटा जंगलमय भागात पसार
कणकवली पोलीस चोरट्याच्या मागावर
महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र ओसरगाव पोलीसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे सावंतवाडी येथून चोरीस गेलेली स्प्लेंडर मोटारसायकल (MH 07 AN 4543) मुंबई गोवा महामार्गावर सावडाव येथे पाठलाग करून पकडली. मोटरसायकल चोरटा मात्र मोटरसायकल सावडाव येथे हायवेवर टाकून हॉटेल आशिष मागील डोंगरभागात पळून गेला. कणकवली पोलीस सदर चोरट्याचा या परिसरात शोध घेत आहेत. 10 जुलै रोजी सकाळी सव्वा नऊ च्या सुमारास ही घटना घडली. महामार्ग वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हेरुगडे यांच्या सूचनेनुसार हवालदार ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल हे कणकवली तालुक्यातील सावडाव फाटा येथे अवैध वाहतूक तसेच वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत होते. त्याच वेळी कणकवलीहून नांदगाव च्या दिशेने विना हेल्मेट आणि मोबाईलवर संभाषण करत जाताना एक मोटरसायलकस्वार दिसून आला. हवालदार राजेश शिवराम ठाकूर आणि कॉन्स्टेबल महादेव दादाराव साबळे यांनी मोटरसायकल स्वाराला थांबण्याचा इशारा केला असता त्याने गाडी न थांबवता नांदगाव च्या दिशेने सुसाट मोटरसायकल पळवली. पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी लागलीच मोटरसायकल चा पाठलाग केला. हॉटेल आशिष च्या नजीक मोटरसायकल रस्त्यावर टाकून मोटरसायकल चोरट्याने नजीकच्या जंगलात पळ काढला. मोटरसायकल नंबर वरून मालकाचे नाव पास्कु झुजे रॉड्रीग्ज असल्याचे आढळून येताच त्यांच्या मोबाईल नंबरवर हवालदार ठाकूर यांनी संपर्क साधला. तेव्हा रॉड्रीग्ज यांनी आपल्या मालकीची सदर मोटरसायकल चोरीस गेली असून तशी तक्रार 9 जुलै रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल केल्याचे सांगितले. हवालदार ठाकूर यांनी तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात चोरीस गेलेली मोटरसायकल पकडल्याचे कळविले. कर्तव्यदक्षपणे चोरीस गेलेली मोटरसायकल पाठलाग करून पकडल्याबद्दल हवालदार ठाकूर आणि कॉन्स्टेबल साबळे यांचे कौतुक होत आहे. दरम्यान कणकवली पोलिसांकडून सदर चोरट्याचा या परिसरात शोध सुरू असून कणकवली पोलिसांनी हे पथक चोरट्याच्या मागावर आहे.