कणकवलीत गुरुपौर्णिमा उत्सव उत्सहात साजरा

विविध कार्यक्रमांची रेलचेल : शिष्यांनी घेतले गुरूंचे दर्शन
तालुक्यात ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिनिमित्त विविध व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण होते.
कणकवली शहरातील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. पहाटे काकड आरती सकाळच्या सत्रात भालचंद्र महाराज यांच्या समाधी स्थळी धार्मिक विधी पार पडले. दुपारी भाविकांच्या उपस्थिती महाआरती झाली. त्यानंतर भाविकानी महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरुपौर्णिमेनिमित्त भालचंद्र महाराज यांच्या समाधी स्थळी फुलांची आरास करण्यात आली होती. विविधरंगी फुलांमुळे भालचंद्र महाराज यांचे रुप मनमोहक दिसत होते. शहरातील निम्मेवाडी येथील प. पू. देवी अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रम भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. सनातन संस्थेने देखील कणकवली शहरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. कळसुली-हर्डी येथील स्वामी समर्थ मठात देखील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पडले. बीडवाडी येथील दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांमुळे कणकवलीनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. तसेच विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांना गुरुप्रति असलेले प्रेम म्हणून पुष्पगुच्छ देत आशीर्वाद घेतले.सोशल मीडियावर आज गुरुपौर्णिमेचा ट्रेड दिसून आला.