जानवली येथील चोरीला गेलेली दत्तमूर्ती मिळाली पण अनेक प्रश्न अनुत्तरीत!

महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा पोलिसांचा दावा?
स्थानिक गुन्हा अन्वेषण व कणकवली पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती समोर येण्याची गरज
जानवली कृष्णनगरी येथील दत्तमंदिरातील चोरीला गेलेली मूर्ती 10 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चोरी झालेल्या दत्तमंदिरानजीकच सापडून आली. परंतु दत्तमूर्ती सापडल्यानंतर या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही दत्तमूर्ती चोरीला गेल्यानंतर कणकवली पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या माध्यमातून तपास सुरू होता. सिसीटीव्ही तपासणी सोबतच अन्य धागेद्वारे शोधण्याच्या कामात पोलीस व्यस्त असतानाच अचानक चोरीला गेलेली दत्तमूर्ती कृष्णनगरी या ठिकाणी महामार्गापासून काही अंतरावर दत्त मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणून ठेवली गेली. परंतु घटना घडल्यापासून आजपर्यंत या घटनेत अनेक प्रश्न अनुत्तरीत राहत आहेत. या घटनेची माहिती समजताच एलसीबी चे पथक तातडीने घटनास्थळी जात त्यांनी पंचनामा केला. तत्पूर्वी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनीही घटनास्थळी जात पाहणी केली. श्वान पथक सुद्धा मूर्ती सापडलेल्या ठिकाणी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक लॅब चे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. 5 जुलै रोजी मध्यरात्री चोरट्यानी चोरलेली मूर्ती पाच दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी चोरट्याने आणून ठेवणे यामागे नेमकी काय कारणे आहेत याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे. दरम्यान सदर स्वयंभू दत्त मंदिर स्थापन झाल्यापासूनच ते नेहमी चर्चेत आहे. 3 जुलै रोजी चौघेजण या मूर्ती ठिकाणी दर्शनासाठी आल्याचे सांगण्यात येत होते. त्यातील काहींनी सदर मूर्ती सोन्याची आहे का अशी विचारणा केली. यावेळी मोहिते यांनी होय असे उत्तर दिले व त्यानंतर पाच जुलै रोजी ही दत्तमूर्ती चोरीला गेली. दरम्यान त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेले तरुण व चोरीदरम्यान सीसीटीव्ही मध्ये दिसलेले तरुण हे साधर्म्य असलेले होते असेही पोलिसांनी घटनेनंतर सांगितले. परंतु पोलिसांना हे चोरटे मूर्ती चोरून गेल्यानंतर फारसे काही पुरावे हाती लागले नव्हते. त्यामुळे या घटनेचा तपास एलसीबी कडे वर्ग करण्यात आला होता. दरम्यान ते दर्शनाकरिता आलेले चौघेजण ते चोरटे नव्हतेच अशी माहिती पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर दिली. मग चोरटे कोण होते? सदर दत्त मूर्ती चोरी गेल्यानंतर जर ती मूर्ती सोन्याची नव्हती तर चोरट्याने सदर मूर्ती पुन्हा या ठिकाणीच आणून कशी ठेवली? चोरट्यांना दैवी प्रचिती आल्याचाही दावा काहींकडून करण्यात येत आहे. परंतु यामध्ये तथ्य किती? पोलिसांची पथके चोरट्यांच्या मागावर असताना चोरट्यानी पुन्हा मूर्ती मंदिरापासून काही अंतरावर आणून ठेवण्याचे धारिष्ट कसे दाखवले? ज्या ठिकाणी चोरट्यानी मूर्ती ठेवली त्या ठिकाणी सीसीटीव्ही ची कक्षा येत नसल्याचे चोरट्यांना माहिती कसे? या चोरी दरम्यान या भागातील मोबाईल लोकेशन चा तपास पोलिसांनी केला तर त्यामध्ये कोणाचे मोबाईल लोकेशन सापडले?, चोरीला गेलेली दत्तमूर्ती ही गुरुपौर्णिमे दिवशीच त्या ठिकाणी आणून ठेवणे हा योगायोग होता ती कसे? चोरलेली दत्तमूर्ती ही धातूची आहे की की सोन्याची याची खातरजमा कुठे गेली? सदर मूर्ती ही चोरट्याने अन्य ठिकाणी न ठेवता घटनास्थळापासून काही अंतरावरच आणून का ठेवली? मूर्तीची चोरी झाली त्यावेळी चोरटे हे जिवंत अडतुसे व रिव्हॉल्वर घटनास्थळी घेऊन आले होते. या चोरीदरम्यान त्यांच्याकडून स्वसंरक्षणासाठी चोरी वेळी आणलेले रिव्हॉल्वर घटनास्थळावर कसे काय पडले. मूर्ती चोरून नेताना त्यांना स्वसंरक्षणा ची काळजी नव्हती का? चोरट्याला मिळालेले रिव्हॉल्वर व जिवंत काडतुसे त्यांनी विनापरवाना आणली तर ती कुठून आणली? विनापरवाना शस्त्र व जिवंत काडतुसे त्यांनी कुठून खरेदी केली? या चोरी दरम्यान मोहिते यांच्या घराच्या मागील व पुढील दरवाज्याला कडी लावून चोरट्याने चोरी केली यार्थी चोरट्याने आपण पकडले जाऊ नये या दृष्टीने काळजी घेतली. मग स्वसंरक्षणाच्या दृष्टीने आणलेले रिव्हॉल्वर चोरटे तेथे टाकून कसे पळाले? यासह अन्य अनेक प्रश्न या चोरीच्या घटनेमध्ये उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या मूर्ती मधील श्वानाचा भाग व त्रिशूल हे नसल्याचे स्पष्ट होत असल्याने जर या भागाची खातरजमा करण्यासाठी चोरट्यानी हा भाग कोणत्याही सुवर्णकाराकडे दाखवला किंवा पडताळणी केला असेल तर अशी ही व्यक्ती कोण? असे एक ना अनेक प्रश्नाबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या संपूर्ण घटनेची सिंधुदुर्ग पोलिसांकडून कसून चौकशी होण्याची गरज आहे. कारण या चोरी मागे मूळ उद्देश काय होता तो देखील जनतेसमोर येण्याची गरज आहे. व तशी मागणी जिल्ह्यातील अनेक नागरिकांकडून समोर येत आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास करण्यात सिंधुदुर्ग एलसीबी गेले काही दिवस आघाडीवर असताना एलसीबी कडून या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे. दरम्यान याबाबत कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी जरी मूर्ती सापडली असली तरी सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे व काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याची ही माहिती दिली. मात्र तपासाच्या अनुषंगाने याबाबत त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
दिगंबर वालावलकर कणकवली