प्रामाणिक कनिष्ठ अभियंत्याच्या बदलीसाठी ठेकेदार लॉबी सक्रिय ?

बदली झाल्यास मनसे करणार ठेकेदारांच्या ‘त्या’ कामांची पोलखोल

मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा इशारा

ब्युरो न्यूज । कुडाळ : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील काही भ्रष्ट अधिकारी व काही मुजोर ठेकेदार मिळून बांधकाम विभागात प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून प्रसिद्ध कनिष्ठ अभियंता विनायक चव्हाण यांच्या बदलीसाठी सक्रिय झाले आहेत. ठेकेदार लॉबी करून सर्वपक्षीय नेत्यांच्या दारोदारी भेटी देत आहेत. अशा प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या दडपशाहीने बदलीचा प्रयत्न झाल्यास ‘त्या’ ठेकेदारांच्या कामांची पोलखोल करणार असल्याचा इशारा मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसाद गावडे यांनी म्हटले आहे, कुडाळ बांधकाम उपविभागात बोकाळलेला तत्कालीन कालावधीतील भ्रष्टाचार व तद्नंतर झालेला निलंबनाचा प्रकाराचे बारकाईने अवलोकन करता यापूर्वी कुडाळ बांधकाम उपविभागात कोणत्या प्रकारची कार्यपद्धती राबविली जात होती याची प्रचिती कुडाळवासीयांनी अनुभवली आहे. त्याजागी आलेला अधिकारी निविदेतील तरतुदीनुसार ठेकेदारांकडून कामे करून घेऊ लागल्याने काही मुजोर व भ्रष्ट ठेकेदारांना त्याचा अडसर ठरू लागला आहे व त्यातून त्यांची इतरत्र बदली करण्यासाठी ठेकेदार लॉबी व भ्रष्ट अधिकारी यांची युती सर्वपक्षीय नेत्यांच्या दारोदारी भेटीगाठी देत आहे. सर्वसामान्यांच्या खिशातून करस्वरूपातून आलेला शासन निधी चांगल्या पद्धतीने वापर व्हावा अशी सर्वसामान्य ग्रामस्थांची अपेक्षा असून अशा प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या दडपशाहीने बदलीचा प्रयत्न झाल्यास त्या ठेकेदारांच्या कामांची ओळख करणार असा इशारा मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!