तळाशील खाडीत नौका बुडाली…

दोन मच्छीमार बेपत्ता एकजण पोहत आल्याने बचावला…

मालवण : तळाशील येथील खाडीत मासेमारीस गेलेली नौका बुडून दोन मच्छीमार खाडीत बेपत्ता झाल्याची घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. यात एक मच्छीमार युवक पोहत किनाऱ्यावर आल्याने बचावला आहे. स्थानिक मच्छीमारांनी बेपत्ता मच्छीमारांचा खाडीत व समुद्रात शोध सुरू ठेवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील तोंडवळी तळाशील वाडी येथील मच्छीमार किशोर महादेव चोडणेकर (वय ५५), त्यांचा मुलगा लावण्य किशोर चोडणेकर (वय-१४) आणि तारकर्ली येथील धोंडीराज परब (वय- ५५) काल हे तिघेजण नौकेतून तळाशील खाडीत काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मासेमारीस गेले होते. मात्र साडे नऊ वाजण्याच्या सुमारास खाडीतील नस्ताच्या ठिकाणी त्यांची नौका बुडाल्याने ते खाडीच्या पाण्यात फेकले गेले. यावेळी किशोर चोडणेकर यांनी त्यांचा मुलगा लावण्य चोडणेकर याला किनाऱ्यावर पोहत जाऊन दुसरी नौका घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार लावण्य हा किनाऱ्यावर पोहत येऊन त्याने नौका बुडाल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांना दिली. स्थानिक मच्छीमारांनी आपल्या नौकांद्वारे खाडी पात्रात त्यांचा शोध घेतला असता रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. याबाबत येथील पोलिसांत खबर देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

error: Content is protected !!