शाश्वत विकासावर आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात

घोडावत विद्यापीठात १७१ संशोधकांचा सहभाग
संजय घोडावत विद्यापीठात इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल हेल्थकेअर, फूड सायन्स अँड एनर्जी (ICSHFE) २०२६ ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. यामध्ये 171 संशोधकांनी सहभाग नोंदवला. तर 34 संशोधकांनी पेपर सादरीकरण केले. स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, स्कूल ऑफ सायन्सेस व स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले.
परिषदेसाठी फार्मसी, आरोग्य व संलग्न विज्ञान, अप्लाइड नॅनोमटेरियल्स तसेच लाईफ सायन्सेस या तीन प्रमुख विषयांतर्गत पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग होता. विशेष म्हणजे सहभागींपैकी ७० टक्क्यांहून अधिक महिला संशोधक होत्या. यावेळी ४५ पोस्टर सादरीकरणे करण्यात आली. तसेच एका स्टार्ट अपद्वारे नव उत्पादनाचे प्रदर्शनही करण्यात आले.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा. उद्धव भोसले व विश्वस्त विनायक भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परिषद स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले व प्रायोजकांचा सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. बी. एल. व्ही. प्रसाद यांनी आंतरशाखीय संशोधन व नॅनोतंत्रज्ञानावर मुख्य भाषण केले. डॉ. एन. आर. जाधव यांनी नवीन औषध वितरण प्रणालीवर तांत्रिक सत्र सादर केले. तसेच डॉ. के. डी. सोनावणे यांनी मॉलिक्युलर डॉकिंग, संगणक-सहाय्यित, औषध डिझाईन व अँटिबायोटिक रेझिस्टन्स यावर मार्गदर्शन केले.
ही परिषद शाश्वत विकासासाठी संशोधन व नवकल्पनांना चालना देणारी व शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील नव संशोधकांना मार्गदर्शक ठरली.परिषदेसाठी संयोजक म्हणून डॉ. आनंद चव्हाण यांनी तर सह-संयोजक म्हणून डॉ. संभाजी पवार आणि डॉ. विद्याराणी खोत यांनी जबाबदारी पार पाडली. याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन केले.





