वक्तशीर, शिस्तप्रिय, लोकनेत्याची अकाली एक्झिट

अजितदादा पवार यांना कुडाळमध्ये सर्वपक्षीयांतर्फे श्रद्धांजली
‘एकवेळ माझ्या वडिलांचं निधन झालं असतं तर मी थांबलो असतो, पण आमचे अजितदादा गेले त्यामुळे मी थांबू शकत नाही, कारण माझं घर त्यांनी उभं केलंय….!!!!’ असं म्हणून सावंतवाडीत काम करणाऱ्या काटेवाडीतील त्या डंपर चालकाने माडखोल येथे आपल्या ताब्यातील डंपर तसाच सोडला आणि तो थेट बारामतीला अजितदादांच्या अंत्यसंस्काराला निघून गेला. सावंतवाडीतील एका काँट्रॅक्टरकडे डंपर चालक असलेल्या डंपरचालकाचं उदाहरण अमित सामंत यांनी दिले. तळागाळातील कष्टकरी लोकांच्या मनात आणि जीवनात अजितदादा पवार कसे घट्ट रुजले होते. हेच अमित सामंत सांगत होते. निमित्त होते राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या शोकसभेचे. कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात झालेल्या या शोकसभेत अनेक मान्यवरांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कुडाळ येथील मराठा समाज सभागृहामध्ये जिल्ह्यातील सर्वपक्षीयांच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या शोसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत अनेकानी अजितदादांच्या आठवणींना आणि आपल्या भावनाना मोकळी वाट करून दिली. सुरुवातीला अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला सर्वानी पुष्पांजली अर्पण करून आणि दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनंतर अजितदादांच्या जुने सहकारी सावळाराम अणावकर गुरुजी यांनी अजितदादा पवार यांना आपल्या शब्दातून श्रद्धांजली वाहिली. लहानथोर माणसांशी अजितदादांची चांगली सलगी होती. त्यांच्यात स्पष्टवक्तेपणा होता. कामाबद्दल कळकळ होती. कोकणाकडे त्यांचे विशेष लक्ष होते असे सांगून आम्ही पोरके झालो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, अजितदादा पवार यांचे गुण अंगी बाळगले तर ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. दुसऱ्याच्या कामात त्यांनी कधी ढवळाढवळ केली नाही. कार्यकर्त्यांची ओळख ते जपायचे. कामाच्या बाबत ते खूप प्रॅक्टिकल होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, आमच्या पिढीने दादांवर प्रेम केलच पण आताची पिढी सुदधा दादांवर प्रेम करते आहे. ते सगळे सोशल मीडियावर ते प्रतिबिंबित होत आहे. दादा कधी काम लटकत ठेवत नसत. पण दादांना मुख्यमंत्री झालेले बघण्याची अनेकांची इच्छा होती ती अपूर्णच राहिली. शिवसेनेचे पदाधिकारी आणि अनेक वर्ष अजितदादांच्या नेतृत्वात काम केलेलं काका कुडाळकर श्रद्धांजली वाहताना म्हणाले, अजितदादा म्हणजे असा नेता की ज्याची अपॉइंटमेंट घ्यायची गरज नव्हती. सकाळी 7 वाजता देवगिरी बंगल्यावर ते सामान्यांना भेटायचे. त्यांची कामे करायची. कार्यकर्त्यांची जाणीव त्यांना होती. प्रशासनावर जबर पकड आणि वचक असलेलं नेतृत्व गेले.
कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी कुडाळवासियांच्या वतीने अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब म्हणाले, राज्याच्या प्रश्नाबाबत दादा काय बोलणार याची उत्सुकता नेहमीच असायची. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीच अनुकरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अजितदादांसारखा वेळ पाळणारा वक्तशीर नेता वेळे आधीच निघून जाणे हि दुर्दैवाची गोष्ट असल्याचे ठाकरेसेनेचे तालुकाध्यक्ष राजन नाईक यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि पवार कुटुंबियांचे निकटवर्ती असलेले व्हिक्टर डांटस हे अजितदादांच्या अंत्यविधीसाठी बारामतीला गेले होते. त्यांनी तिथली परिस्थिती सांगताना अजितदादा कसे जनसामान्यांच्या हृदयात वसले आहेत याची आठवण करून दिली. बारामती कशी शोकाकुल होते. रस्ते निर्मनुष्य होते. आपल्याच घरातलं कोणी गेल्या सारख वातावरण बारामतीमध्ये होते. अजितदादांबद्दल बोलताना श्री. डांटस म्हणाले, अजितदादा झापटल्या सारख काम करत होते. शाश्वत विकासासाठी त्यांचा अट्टाहास होता. त्यांना पटलं तर सगळ्यांची काम करायचे. कोकणातील आंब्यावर काम करण्यसाठी त्यांनी फेब्रुवारी मधील वेळ दिला होता. पण त्यांचा सिंधुदुर्ग दौरा आता काही होणार नाही. त्यांना नेहमीच सिंधुदुर्गचे काळजी होती. शिवराम भाऊ जाधव आजारी होते. त्यावेळी दादांनी अशी मदत केली. डॉक्टना केरळ मधून कस बोलावून घेतलं याची आठवण श्री. डांटस यांनी सांगितली.
यावेळी काँग्रेसचे अभय शिरसाट, शिवसेनेचे संजय भोगटे, भाजपचे राजू राऊळ, द्वारकानाथ घुर्ये, बाळ कनयाळकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, वेंगुर्ल्याच्या माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, सुंदर सावंत, एम के गावडे, कल्पेश सुद्रिक, ऍड. रेवती राणे, नितीन वाळके यांनी अजितदादा पवार याना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जिल्हाध्यक्ष अमित सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, काका कुडाळकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, मनसे जिल्हाप्रमुख धीरज परब, राजू राऊळ, व्हिक्टर डांटस, नितीन वाळके, सावळाराम अणावकर, ठाकरे सेने तालुका प्रमुख राजन नाईक, काँग्रेसचे अभय शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, प्रा. अरुण मर्गज, एम के गावडे, शिवाजी घोगळे, संतोष शिरसाट, नगरसेवक गणेश भोगटे, नयना मांजरेकर, चांदनी कांबळी, मनसे उपजिल्हाप्रमुख कुणाल किनळेकर, राकेश कांदे, बाळ कनयाळकर, सुंदर सावंत, संजय भोगटे, कल्पेश सुद्रीक, नम्रता कुबल, डी. जी. सावंत, ऍड. रेवती राणे, विद्याप्रसाद बांदेकर, लालू पटेल, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.





